मुंबईच्या सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प आज सादर होणार

0

मुंबईच्या सर्वांगीण विकासाचा महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्प उद्या 4 फेब्रुवारी रोजी मांडला जाणार आहे. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना अर्थसंकल्प सादर करतील. यामध्ये मुंबईकरांना 24 तास पाणी देण्यासाठी गारगाई, पिंजाळ, दमणगंगासारखे नवे जलप्रकल्प, प्लॅस्टिकचा समावेश असलेल्या मटेरियलपासून मजबूत रस्ते, पाणी साचण्यातून सुटका होण्यासाठी उद्यानांखाली भूमिगत तलाव, आरेतील भव्य प्राणी-पक्षी उद्यानासह कोस्टल रोड, मियावकी वने, शिक्षण, आरोग्यासाठीही भरीव तरतूद केली जाणार आहे. महानगरपालिकेचा सादर होणारा अर्थसंकल्प हा मुंबईच्या सर्वांगीण विकासाचा असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामध्ये नवे प्रकल्प, पूल-रस्ते आणि योजनांसह सुरू असणाऱया प्रकल्पातील कोस्टल रोड, उद्याने, मैदाने, शैक्षणिक योजनांसाठी निधीची तरतूद केली जाणार आहे. मुंबईकरांना जास्तीत जास्त पायाभूत सुविधा देण्यासाठी भांडवली खर्च वाढवण्याचीही शक्यता आहे. जीएसटी लागू केल्यामुळे पालिकेला जकातीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न बंद झाले असले तरी याची संपूर्ण भरपाई राज्य सरकारकडून दरमहा सुमारे साडेसातशे कोटी पालिकेला मिळत आहे. त्यामुळे मुंबईकरांवर या वर्षीदेखील कोणतीही करवाढ लादली जाणार नाही हे स्पष्ट होत आहे. शिवाय ‘बेस्ट’ला आर्थिक संकटातून बाहेर काढून सक्षम करण्यासंदर्भातही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो. याशिवाय पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना पालिकेच्या नोकरीत प्राधान्य, डबेवाला भवन, ज्येष्ठ नागरिकांना विरांगुळा केंद्र, सायकलिंग ट्रक, नवे जलतरण तलाव यांची घोषणा होऊ शकते.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here