सध्या संगमेश्वर-देवरूख-साखरपा या रस्त्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी हे काम निकृष्ट होत असल्याचे त्या त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांचे म्हणणे असून हे काम टिकाऊ आणि दर्जेदार होण्यासाठी आता गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर येत्या ५ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा सत्याग्रह करणार आहेत. संगमेश्वर-देवरूख रस्त्यालगतच साडवली येथे भोपळकर यांच्या निवासस्थानासमोर निष्कर्ष लॅबच्या बाजूला भोपळकर आणि गाव विकास समितीचे सदस्य हे आंदोलन करणार आहेत. याबाबतचे निवेदन भोपळकर यांनी संगमेश्वरच्या तहसीलदारांना दिले आहे. बऱ्याच कालावधीनंतर होणारा हा रस्ता टिकाऊ, दर्जेदार आणि नियमानुसार व्हावा ही नागरिकांची मागणी आहे. गाव विकास समितीमार्फत याआधीही याबाबत निवेदन दिले होते. येत्या ५ फेब्रुवारीला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत आंदोलन केले जाणार आहे. रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण होत आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्रयस्थ यंत्रणेमार्फत काम सुरू असतानाच पाहणी करण्यात यावी, अशी मुख्य मागणी गाव विकास समितीने केली आहे. सुमारे ३२ किलोमीटरच्या या रस्तारुंदीकरणासाठी ३२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. म्हणजे एका किलोमीटरला सरासरी एक कोटी मंजूर आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम त्याच दर्जाचे झाले पाहिजे. रुंदीकरण नियमानुसार व्हावे. नागरिकांच्या तक्रारी आणि सूचनांसाठी संपर्क क्रमांक जाहीर करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. हा सत्याग्रह शांततेच्या माध्यमातून, यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी केला जाणार असल्याचे भोपळकर यांनी म्हटले आहे.
