बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात एल्गार पुकारलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चाची ‘मोर्चेबांधणी’ ही चांगलीच सुरु केली आहे. मुंबईतील वर्सोवा भागात मनसेच्या वतीने बांगलादेशी घुसखोरांना इशारा देणारं पोस्टर लावण्यात आलं आहे. वर्सोव्यातील बांगलादेशी घुसखोरांना मनसे इशारा, तुमच्या देशात निघून जा, असं पोस्टरवर मराठीत लिहिण्यात आलं आहे. मनसेचे वर्सोवा विभाग संदेश देशाई आणि उपविभाग अध्यक्ष अशोक पाटील यांची पोस्टरवर नावं आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात 9 फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता मनसेचा मोर्चा निघणार आहे. पोलिसांनी मनसेला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या नव्या मार्गावरून मोर्चा नेण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, या मोर्चाचा मार्ग याआधी मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले विद्यानापासून आझाद मैदानापर्यंत ठरवण्यात आला होता. मात्र मुंबई पोलिसांनी भायखळ्यातून मोर्चा काढण्यास नकार दिल्याने हा बदल केल्याचं सांगण्यात येत आहे.
