कोरोना व्हायरसने चीनमध्ये चांगलाच तांडव निर्माण केला आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. या भयंकर अशा कोरोना व्हायरसचे रुग्ण भारतातही आढळले आहेत. केरळमध्ये तीन जणांना या व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. तीनही रुग्ण केरळचे रहिवासी आहेत, त्यामुळे कोरोना व्हायरसला केरळसमोरील मोठं संकट म्हणून घोषित करण्यात आलं आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी ही घोषणा केली आहे. केरळचे आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी विधानसभेत याविषयी माहिती दिली. रविवारपर्यंत राज्यात 104 नमुन्यांची चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये तीन जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तिन्ही रुग्ण चीनमधून केरळमध्ये परतले होते. वुहानमधील विद्यापीठात शिक्षणासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याचा यामध्ये समावेश आहे. या विद्यार्थ्याला कासारगोडमधील कान्हानगड जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.
