वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले आहे.रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरीत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले.चिपळूणातील वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून बाजारपूलावर पाणी आले आहे.चिपळूण शहरात पुराचे पाणी भरायला सुरुवात झाली असून काही परिसर जलमय झाला आहे. चिपळूण शहरात सातत्याने पाणी भरत असून खेर्डी ते बाजारपेठ दरम्यान अडीच महिने रखडलेल्या गटराच्या कामाचा फटका शहराला बसत आहे.रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने चांदेराई बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले.पावसाचा जोर वाढत असल्यामुळे चांदेराई परिसराला पुराचा धोका कायम आहे.चांदेराई बाजारपेठेतील दुकानांचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे.
