विजयदुर्ग सागरी किल्ल्याच्या गौरवशाली इतिहासाचा जागर करा : अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर

0

मुंबई : मराठा साम्राज्याचे शक्तीस्थळ असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग हा नावाप्रमाणेच गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा किल्ला आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी मराठा आरमाराला प्रभावी बनवले आणि इंग्रज, चाचे, जंजिर्याचे सिद्धी, पोर्तुगीज अशा सागरी सत्तांना शह दिला; परंतु आजमितीला यावर प्रकाश टाकणारे पुरेसे साहित्य नाही. या गोष्टी केवळ पर्यटनाच्या दृष्टीनेच नव्हे, तर ऐतिहासिक, नाविक अशा अनेक दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. ईस्ट इंडीया कंपनीच्या स्वारीला मूठभर नाविकांनी विजयदुर्गावरून कशी मात दिली, हे आज महाराष्ट्राला माहिती नाही. या किल्ल्यावर पर्यटन विकास महामंडळाने उभारलेला एक पडका फलक उभा आहे; मात्र तोही अपुरा आहे. विजयदुर्गची विजयगाथा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी आणि गौरवशाली इतिहासाचा जागर व्हायला हवा, असे हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवरायांनी वर्ष 1653 मध्ये हा किल्ला ताब्यात घेऊन त्याचे ‘विजयदुर्ग’ असे नामकरण केले. त्या काळी होणारी सागरी आक्रमणे थोपवण्यासाठी या प्राचीन किल्ल्याच्या भोवती बांधण्यात आलेली संरक्षक दगडी भिंत, हा स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. गोव्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओशनोग्राफी’ या शासकीय संस्थेने वर्ष 1998 मध्ये विजयदुर्ग आणि आजूबाजूच्या परिसराची पहाणी करून त्याविषयीचा एक महत्त्वपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला होता. ‘समुद्राच्या पाण्याखाली विविध दगड रचून केलेले 122 मीटर लांब आणि 3 मीटर उंच भिंतींचे बांधकाम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या संरक्षक भिंतीमुळे मोगल, इंग्रज किंवा पोर्तुगीज यांच्या अवाढव्य जहाजांना आपटणे आणि फुटणे हा धोका निर्माण झाला होता; पण मराठ्यांच्या हलक्या आणि लहान आकाराच्या नौकांना मात्र तो नव्हता. तसे पाहिले, तर मराठा बांधकामाच्या इतिहासाच्या हे एक अद्भुत नियोजन मानले गेले पाहिजे; मात्र आजघडीला याबाबत कोणतीही चर्चा होत नाही. या किल्ल्यापासून 3 किलोमीटर अंतरावरील वाघोटण नदीमधील आरमाराची गोदी (डॉकयार्ड) आणि जहाजांचे नांगर टाकण्यासाठी केलेले दगडी बांधकामही वैशिष्ट्यपूर्ण आहे.
अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी महाराष्ट्राचे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री, तसेच गडकिल्ले जतन आणि संवर्धन समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडे या संदर्भात एक निवेदन दिले आहे आणि त्यामध्ये त्यांनी शासनाकडे या संदर्भात पुढील मागण्या केल्या आहेत.

  1. शासनाने विजयदुर्ग किल्ल्याविषयीच्या संशोधनाची व्यापक प्रसिद्धी करावी.
  2. वर्ष 1998 मध्ये झालेल्या संशोधनाला आधारभूत धरून नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुढील संशोधन करावे.
  3. ऐतिहासिक स्थानांचा गौरवशाली इतिहास शालेय पाठ्यपुस्तकांत, तसेच शासकीय संकेतस्थळांवरही प्रसिद्ध करावा.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:12 PM 23-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here