लांजा: आठवड्यापूर्वी घर बंद करून कामाला गेलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याचे घर फोडून १ लाख रुपये रोख व तीन लाख रुपये किमतीचे सोने – चांदीचा दागिने चोरून गेल्याची घटना वाडिलिंबू – सापुचेतळे येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. गणेश पांडुरंग चव्हाण (२९) हे महावितरण कंपनीमध्ये रत्नागिरी येथे लिपीक म्हणून कामाला आहेत. सापुचेतळे वाडीलिंबू येथे त्यांचे घर आहे. २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता घर बंद करून ते रत्नागिरी येथे कामाला निघून गेले होते. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता गणेश चव्हाण आपल्या घरी आले. तेव्हा घराच्या दरवाजाचे कुलूप उचकटलेले असल्याचे त्यांना दिसले. घरामध्ये असलेले लोखंडी कपाट फोडून त्यामध्ये असलेली १ लाखांची रोख रक्कम तसेच १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, ७५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या सात अंगठ्या, ३० हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस, १५ हजार रुपये किमतीचा कानातील टाँट जोड, १५ हजार किमतीचा सोन्याचा कानातील चेन जोड, ३ हजार किमतीचे सोन्याचे पान, २ हजार ५०० रुपये किमतीचे ब्रेसलेट, १ हजार रुपये किमतीची चांदीची नाणी, ५ हजार किमतीचे पैंजण असा एकूण ३ लाख ८२ हजार किमतीचा ऐवज रोख रकमेसह चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
