सिंधुदुर्गात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला

0

कणकवली : सिंधुदुर्गात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. जोरदार सरी कोसळत असल्याने जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कॉजवेंवर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली होती. तर आचरा परिसरात वादळी वार्‍यामुळे झाडे उन्मळून पडली होती. पावसाचा जोर वाढल्याने त्याचा जनजीवनावरही काहीसा परिणाम होत आहे. सिंधुदुर्गात पाऊस समाधानकारक असताना गेल्या दोन दिवसांपासून जोरदार सरी कोसळू लागल्याने दुथडी भरून वाहणार्‍या नदी, नाल्यांना आता पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विशेषतः सह्याद्री पायथ्याच्या गावांमधील ग्रामीण रस्त्यांवर असलेल्या छोट्या कॉजवेंवर अनेक ठिकाणी अधूनमधून पुराचे पाणी येऊ लागल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्याने नागरिकांमधूनही त्याची खबरदारी घेत घराबाहेर पडणे टाळण्यात येत असल्याने परिणामी  बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी काहीशी कमी झाल्याचे दिसून येते. नदी, नाल्यांना पूर आल्याने विशेषतः मोठ्या नद्यांच्या काठांवर असणार्‍या व नेहमी पुराचा फटका बसणार्‍या लोकवस्त्यांमधील नागरिक सतर्क बनले आहेत. जिल्ह्यातील प्रमुख नद्या असलेल्या गडनदी, जानवली नदी, पियाळी नदी, शुकनदी, शांतीनदी, पीठढवळ नदी, भंगसाळ नदी या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसाचा सर्वाधिक फटका महामार्ग चौपदरीकरण कामाला बसला असून कणकवली शहरासह अनेक ठिकाणी असलेल्या सर्व्हीस रोड व डायव्हर्शनवरील खड्ड्यांची व्याप्ती वाढली आहे. खड्ड्यांमध्ये चिखलमय पाणी साचून राहत असल्याने कसरत करतच त्यातून ये-जा करावी लागत आहे. पावसाच्या कोसळणार्‍या सरी आणि रस्त्यावरील खड्डे याचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. पाऊस पडलेला असल्याने या खड्ड्यांवर उपाययोजना करणेही शक्य झालेले नाही. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास या रस्त्यांची स्थिती आणखीनच बिकट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here