रत्नागिरी: लोकमान्य टिळक स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त भव्य शोभा यात्रा संपन्न

0

लोकमान्य टिळकांनी आपल्या राष्ट्राच्या हितार्थ ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा सवाल उपस्थित केला होता. एक समाजसुधारक, प्रबोधनकार, असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांचा संपूर्ण देशातील लोकांना अभिमान आहे. शोभायात्रेच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांच्या स्मृती पुन्हा एकदा जागृत झाल्या, असे प्रतिपादन लोकमान्य टिळक स्मृती शोभायात्रेचे स्वागताध्यक्ष आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी लक्ष्मी चौक येथील आयोजीत कार्यक्रमात केले.
रत्नागिरीतील राष्ट्रसेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त लोकमान्य टिळक जन्मभूमी ते लक्ष्मी चौक यादरम्यान भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. स्वागताध्यक्ष अॅतड. दीपक पटवर्धन, राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका चित्रा जोशी, यांनी लोकमान्यांच्या स्मारकातील पूर्णाकृती मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. पटवर्धन आणि संतोष पावरी यांनी टिळकांच्या प्रतिमा असलेली पालखी खांद्यावर घेतली आणि शोभायात्रेला प्रारंभ झाला. तत्पूर्वी जीजीपीएसच्या विद्यार्थ्यांनी टिळकांवरील आरतीचे गायन केले. शोभायात्रेला उदंड प्रतिसाद लाभला. राष्ट्रसेविकांचे सघोष संचलन, लेझिम, शिस्तबद्ध संचलन, कलशधारी महिला, पारंपरिक वेशभूषेत नागरिक सहभागी झाले. तसेच लोकमान्य टिळक, डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा चित्ररथ यांचा समावेश होता. शहराच्या मुख्य रस्त्यांवर लोकमान्यांच्या नावाचा गजर करण्यात आला. लोकमान्य टिळक स्मारक ते गोखले नाका, मारुती आळी, राम आळी, गोखले नाका, सावरकर चौक आणि त्यानंतर लक्ष्मी चौक अशी ही शोभायात्रा निघाली. लक्ष्मी चौकात शोभायात्रेचे जाहीर सभेत रूपांतर झाले. या वेळी राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका चित्राताई जोशी यांनी समितीच्या कार्याची माहिती दिली. तसेच विराट शोभायात्रेने लोकमान्यांना आदरांजली वाहिल्याचे समाधान वाटत आहे, असे त्यांनी सांगितले. लोकमान्यांच्या जन्मगावी होणारी हा उपक्रम म्हणजे राष्ट्राभिमान जागृत करणारी यात्रा म्हणावी लागेल, असे त्या म्हणाल्या. यावेळी राष्ट्रसेविका समितीच्या वतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर वर्षभरात आयोजित विविध स्पर्धा, विविध कार्यक्रमांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रसेविका समितीच्या जिल्हा कार्यवाहिका अपूर्वा मराठे, विद्या पटवर्धन, उमा दांडेकर, अनुष्का महाजन, सुनेत्रा जोशी, मानसी डिंगणकर, बाबा परुळेकर, विलास पाटणे, संतोष पावरी, भाजप शहराध्यक्ष सचिन करमरकर, डॉ. सुभाष देव, मंदार सावंतदेसाई, प्रशांत डिंगणकर आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here