छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरुन पुन्हा वाद सुरु झाला आहे. शिवजयंती ही तिथीनुसारच साजरी करावी असा शिवसेनेचा नेहमी आग्रह राहिला आहे. त्यानुसार शिवसेना शासकीय तारखेला फाटा देत तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आली आहे. मात्र, आता राज्यात महा विकास आघाडीचं सरकार असून उद्धव ठाकरे हे या सरकारचे मुख्यमंत्री आहेत. तेव्हा शिवजयंती साजरी करण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकप्रकारे धर्मसंकटात सापडले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने तिथी सोडा, तारखेनुसारच शिवजयंती साजरी करा अशी मागणी केली आहे. अशा बिकट परिस्थितीत राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी शिवसेनेची भूमिका मांडली आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शासकीय शिवजयंती (तारखेनुसार 19 फेब्रुवारी) साजरी करतील, मात्र शिवसेना तिथीप्रमाणे शिवजयंती करणार आहे,’ असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. शिवजयंती एकाच दिवशी साजरी व्हावी हा वाद सोडवण्यासाठी त्याबाबत सरकार एक समिती स्थापन करणार आहे. त्यानंतर शिवजयंती बाबत निर्णय होईल, असंही अनिल परब यांनी सांगितलं.
