रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे मंगळवारी चिपळूण व खेर्डी परिसरात सहाव्यांदा वाशिष्ठी व शिव नदीचे पाणी शिरले. खेडमध्येही पूरस्थिती होती. राजापूर शहरात अर्जुना नदीचे पाणी घुसले; तर संगमेश्वर तालुक्यातील माखजन, आरवली बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी घुसले. मंडणगडात घर कोसळून नुकसान झाले असून चिपळूण शहरातील महालक्ष्मी नगर येथे एका घरालगत दरड कोसळली. रत्नागिरी तालुक्यात पडझडीच्या घटना घडल्या. रत्नागिरी शहरातील शिर्के हायस्कूलचे छप्पर वार्यामुळे कोसळले; तर चांदेराई, पोमेंडी भागात पुराचे पाणी घुसले. लांजा तालुक्यात पाऊस जोरदार बरसत होता. मात्र नुकसानीची घटना घडलेली नाही.
