जगभरात कोरोना व्हायरस ने धुमाकूळ घातला असताना आता त्याबद्दलच्या अफवाही वेगाने पसरत आहेत. कोरोनाचे दोन रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त सर्वत्र फिरत असून सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र अशा प्रकारचे कोणतेही रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी स्पष्ट केले आहे.कोरोना रुग्ण भारतात केरळ येथे सापडले आहेत तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तीन विद्यार्थिनी चीन येथे वैद्यकीय अभ्यासासाठी चीन येथे असून त्या सुखरूप असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. तर खबरदारी म्हणून जिल्हा शासकीय रुग्णायलात कोरोना रुग्णासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आली असून ती सध्या बंद आहे. या व्यतिरिक्त कोरोनाबाबत जिल्ह्यात कोणताही अलर्ट नाही. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रत्नागिरीच्या सोशल मीडियावर नागरिकांमध्ये भीती व्यक्त करणारी बातमी फिरत होती. त्यानुसार गावडे आंबेरे येथील दोघांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे या बातमीत म्हटले होते. मात्र या बातमीत अनेक चुकीचे संदर्भ आहेत. या बातमीत ज्या दोन रुग्णांची नावे देण्यात आली आहेत तशा नावाचे रुग्ण कोरोनाच नव्हे तर अन्य कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सकांनी मात्र या बातमीत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु कोरोना विषाणूपेक्षाही अत्यंत वेगाने पसरणाऱ्या अफवांच्या विषाणूंची मोठी भीती निर्माण झाली असून नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे.
