रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवा – जयंत पाटील

0

रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असलेल्या प्रकल्पासंदर्भात धरणग्रस्तांचे पुनर्वसन व इतर प्रश्न तातडीने सोडवून प्रकल्प जलदगतीने पुर्ण करावेत असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे दिले. रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्यासमवेत जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असलेल्या विविध प्रकल्प व त्याच्या अडीअडचणीबाबत मंत्रालयात बैठक झाली. प्रकल्पातील पुनर्वसनाचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबतची कार्यवाही तसेच वनक्षेत्र परवानगी आदींबाबत विभागाने तातडीने कार्यवाही करावी. त्यामुळे या भागातील महत्वाचा प्रश्न सुटेल, असेही मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले. अलिबाग तालुक्यातील सांबरकुंड मध्यम प्रकल्प, पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून पाणी वितरण होणाऱ्या कालव्यांच्याबाबतचे प्रश्न, महाड तालुक्यातील घुरुपकोंड पाझर तलाव, खैरे धरण, कोतर्डे धरण येथील सद्यस्थिती व समस्यांबाबत त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पोयनार या अपूर्ण असलेल्या लघु पाटबंधारे योजनेतील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व समस्यांबाबत खासदार सुनिल तटकरे यांनी प्रश्न मांडून सविस्तर चर्चा केली. यातील प्रत्येक प्रकल्पाबाबत असलेल्या अडीअडचणीबाबत प्रधान सचिव चहल यांनी माहिती दिली. या बैठकीत रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील अपूर्ण लघु पाटबंधारे योजना व मध्यम प्रकल्पांच्या सद्यस्थितीबाबतही चर्चा झाली. यावेळी माजी आमदार संजय कदम, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव इ.सिं.चहल, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलिल अंसारी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here