टिटवाळा (कल्याण) : कल्याणमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चार ते पाच दिवस पाण्याखाली असणाऱ्या रूंदे गावाजवळील काळू नदीवरील पुलाचा स्लॅब पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने वाहतूकीसाठी अडथळा निर्माण झाला आहे. याबाबत सोशल मीडियावर फोटो आणि पोस्ट व्हायरल होताच कल्याण सार्वजनिक बांधकाम उपविभागाने याची तत्काळ दखल घेत वाहून गेलेल्या जागेवर तात्पुरती दुरुस्ती करण्यास सुरुवात केली आहे. १९९८ साली युती सरकारच्या काळात हा पूल बांधण्यात आला होता. तत्कालीन आमदार दिगंबर विशे यांच्या काळातील हा पूल असून या पुलावरून भागातील रूंदे, आंबिवली, फळेगांव, मढ, उशिद, भोंगळपाडा, दानबाव, पळसोली, हाल, काकडपाडा आदी गावांतील लोक ये- जा करतात. तसेच या मार्गावरून वाशिंदवरून मुंबई – नाशिक महामार्गावर देखील जाता येते. पावसाळ्यात हा पुल बऱ्याचवेळा पाण्याखाली जातो. यामुळे येथील नागरिकांची शालेय विद्यार्थी तसेच चाकरमानी यांची चांगलीच वाताहत होत असते. या ठिकाणी नवीन उंच पूल भरण्यात यावा अशा प्रकारची मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
