मागणी असलेल्या वाणांवर संशोधन व्हावे : कृषीमंत्री दादा भुसे

0

दापोली : देशाच्या कृषी विकासात कृषी विद्यापीठाचे योगदान बहुमूल्य आहे. शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, तसेच त्याला समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. ‘विकेल ते पिकेल’ ही मुख्यमंत्र्यांची संकल्पना साकारण्यासाठी ज्या वाणांना बाजारात मागणी आहे ती पिकवून गुणवत्तापूर्ण उत्पादन ग्राहकांच्या पसंतीस उतरेल या दृष्टीने संशोधनास चालना दिल्यास शेतकऱ्यांचे जीवनमान वाढू शकेल, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केले. डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात ते ऑनलाईन सहभागी झाले होते. ते पुढे म्हणाले की, जागतिक तापमानवाढीचे संकट बघत त्याअनुषंगाने कृषी विद्यापीठांनी संशोधनाची दिशा ठरवावी. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. अनेक शेतकरी व त्यांची मुले नवनवे प्रयोग करीत आहेत, त्याची दखल घेऊन सोशल मीडियाद्वारे संबंधितांची पाठ थोपटल्यास अधिक चांगले संशोधन होऊ शकेल, असे ते म्हणाले. पदवीदान समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. चारुदत्त मायी हे दीक्षांत भाषणात म्हणाले की, शिकणे ही प्रकृतीची गती कायम राखणारी निरंतर प्रक्रिया असल्याने विद्यार्थ्यांनी ती थांबवू नये. बाजाराच्या गरजांशी जुळवून घ्यायला हवे. बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान, उच्च तंत्रशुद्ध उत्पादने, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि बौद्धिक संपदा या संबंधित समस्यांसह विज्ञान आणि तंत्रज्ञानात अलीकडे झालेल्या प्रगतीबाबत स्वत:ला सुसज्ज ठेवावे लागेल. बदलल्या हवामानाचा अवलंब करू शकणाऱ्या नवीन प्रजातीच्या जलद विकासासाठी आपल्याला अनुवंशिक सुधारणा, कृषिविषयक हाताळणी, एकात्मिक शेतीचा दृष्टिकोन, संतुलित नैसर्गिक संसाधनांचा वापर वेळेवर हस्तक्षेप त्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे ते म्हणाले. कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते २०१८-१९ आणि २०१९-२० या वर्षामधील सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. ॲस्पी सुवर्णपदक, सर रॉबर्ट अलन सुवर्णपदक, कै. डॉ. जी. जी. ठाकरे सुवर्णपदक, हेक्झामार सुवर्णपदक, कै. मंदाकिनी सहस्त्रबुद्धे सुवर्णपदक, कै. अरुण भैय्या नायकवाडी सुवर्णपदक, कै. श्रीमती नीलिमा श्रीरंग कद्रेकर सुवर्णपदकही गुणवंतांना प्रदान करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:43 PM 03-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here