‘लांजा-कुवेतील वाडीवस्त्यांची नावे बदलण्यापूर्वी ग्रामसभेचे आयोजन करावे’

0

लांजा : लांजा-कुवेतील वाड्यांची पारंपारिक नावे बदलण्यापूर्वी ग्रामसभेचे आयोजन करावे अशी मागणी लांजा तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी, नगरपंचायत कार्यालय लांजा यांना करण्यात आली आहे. लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रात लांजा शहर व कुवे गाव समाविष्ट करण्यात आलेले आहे. शासनाच्या परिपत्रकातील निर्णयाच्या अनुषंगाने नगरपंचायत प्रशासन कार्यक्षेत्रातील वाड्यांची नावे बदलणार असल्याचे समजते. मात्र वाडी वस्तीतील संघटित रहिवाशी घरांच्या समूहाला त्या त्या ठिकाणा नुसार प्रचलित नावे परंपरागत पूर्वीपासून देण्यात आली होती आणि त्या नावा नेच वाडी वस्ती ची ओळख आजही प्राधान्याने प्रचलित आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात वा त्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात बारा बलुतेदारांच्या वाडी वस्तीत विखुरलेल्या पूर्वीच्या तीन मोठ्या लोकवस्तीच्या गाव वाडी समूहाने एकत्रित येऊन लांजा गाव निर्मिती झाल्याची नोंद जुन्या कागदपत्रात महसुली दप्तरी आढळून येते. त्या कालखंडात लांजा, कसबा व कल्याण गावांच्या सीमा लगत होत्या. त्या सीमा अंतर्गत पू़ंर्वापार त्या गावातील दैवते एकमेकांना पूरक असून त्या दैवतांचे मानकरी, तिन्ही लोकवस्तीच्या गावातील दैवतांशी त्यांच्या उत्सव प्रक्रियेत आजही निगडीत आहेत. लांजा गाव होळीचे उत्सव कार्यक्रम, धनी केदारलिंग, धनी पैालतेश्वर, स्वामी मठ आदी देवळांच्या पालखी सोहळे, मुस्लिम समाजाचे दर्गा हुरूस कार्यक्रमात मानकरी शेट्ये, नाईक-शिंदे व कुलकर्णी आदींनी दर्ग्यातील स्थानावर चंदन लावणे व चादर चढवणे विधी केल्याशिवाय हुरुस सुरु होत नाही तसेच हिंदू मांनकऱ्याशिवाय मोहरमचा ताबूत मिरवणूक सुरू होत नाही. तसेच श्री देव चव्हाटा होळीत मुजावर यांच्या वाजंत्री ताशा वाजल्याशिवाय व गावातील सर्व देवांची निशाणे आल्याशिवाय होळी उत्सव साजरा करण्यात येत नाही. देवराई रहाटीतील शेती पूर्वकार्यक्रम संपन्न होण्यासाठी आई जुगाई कडे करावयाची मागणी, चैत्र पौर्णिमेचे धनी केदार लिंग, महाशिवरात्रीची धनी पोलतेश्वर व देव दिवाळी च्या वेळी आई जाकादेवी या दैवतांचे उत्सव गावपातळीवर होत असतात. खाजगी मालकीच्या श्री देव हनुमान व श्री दत्त मंदिरातील वार्षिक उत्सव गावातील जनसमुदाय एकत्र येऊन आजही अव्याहतपणे करत असतात. लांजातील गुरव वाडीत खावडकरांचा मूळपुरुष समाधी कार्यक्रम एकोप्याने साजरा करण्यात येतो. लांजा गावाच्या त्या त्या देवतांच्या होळी मांडावर शिमगोत्सव होळी सोहळे पार पडतात. प्रथेनुसार पाचाच्या मांडावरून गावातील सर्व मांनकऱ्यांना घेऊन लांजावासियांकडून एकात्मतेचे दर्शन देणारा रंगपंचमी कार्यक्रम व त्याच्या दुसऱ्यदिवशी देवराई गावातील कावड घेऊन तेथील मानकरी लांजा गावातील सर्व देवांच्या होळी मांडावर कावड-होळी भेट कार्यक्रम साजरा करतात. श्रावण महिन्यात लिंगायत समाजाचे गुप्त श्री स्वामींची वापरातील काठी व घंटिचे दर्शन‌ लांजा वासियांना देऊन त्यांचा आशीर्वाद घरोघरी मिळत असतो असा प्रघात आहे. त्याप्रसंगी घरी येणाऱ्या स्वामींकडून गुप्त झालेल्या स्वामींच्या वापरातील साहित्यांची पूजा व आरती करण्यात येते. धनी केदारलिंगाचे घरोघरी होणारे गृह देवतेवरील शिंपणे, देव चव्हाटा प्रांगणातील प्रथेनुसार विडा भरणे कार्यक्रम सर्व मानकऱ्यांना घेऊन गाव पातळीवर हे उत्सव आजवर साजरे करण्यात येतात. गाव रहाटितील पारंपारिक सर्व कार्यक्रम त्या-त्या वाडीतील लोकांकडून ऋणानुबंधनाने वर्षानुवर्षे चालीरिती नुसार वादविवाद न होता अव्याहतपणे सुरू आहे. लांजा गावातील वाडीची नावे जात निहाय नसून गावातील आध्यात्मिक व दैवतांच्या कामातील अनुषंगाने पारंपारिक वर्षानुवर्षे गावाशी निगडित आहेत. वाडी वस्ती गावातील सामाजिक आणि आध्यात्मिक चळवळ राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेने नांदवली जाते. त्यानुसार नगरपंचायत प्रशासनाने पूर्वापार प्रचलित असलेली वाडीची नावे बदलू नयेत अशा सर्वच नागरिकांचा मानस असल्याचा या पत्राद्वारे प्रशासनाकडे नम्रपणे विदीत करण्यात येत आहे. लांजा गाव निर्मितीच्या पूर्वी बारा बलुतेदारांच्या वस्तीने सुखासमाधानात नांदत असणार्‍या या गावातील वाडीवस्त्यांची नावे त्या काळापासून प्रचलित आहेत. त्या-त्या वाडीचा वरील परिच्छेदात नोंद केलेले गावातील दैवतांच्या उत्सव कालावधीत त्यांचा थेट संबंध असल्यामुळे वाड्यांची नावे बदलणे योग्य ठरणार नाही. नगरपंचायत स्तरावर ग्रामसभेचे वाडीवस्त्यांची नावे बदलण्यापूर्वी ग्रामसभेचे आयोजन करावे. याकामी जनसमुदायाचा कौल घेऊन अथवा त्या-त्या वाडीतील नागरिकांना विश्वासात घेऊन शासन परिपत्रकातील निर्णय घेताना नगरपंचायतीला लोकसहभागातून विश्वासार्हता वाटेल अशी वाटचाल करावी, असे लांजा तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न सुभाष शेट्ये यांनी म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:11 PM 03-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here