मास्क न घालणाऱ्यांवर मुंबई पोलिसांची धडक कारवाई, एका दिवसात 6 हजारांहून अधिक लोकांकडून दंड वसूल

0

मुंबई : विना मास्क न फिरणाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मोहीम उघडली होती. मास्क न घालणाऱ्यांकडून महानगरपालिकेप्रमाणेच मुंबई पोलिसांनी सुद्धा दंड आकारण्यास सुरुवात केली होती. पण ही कारवाई मध्यंतरी मुंबई पोलिसांनी बंद केली होती. आता ही कारवाई गुरुवारपासून पुन्हा युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आल्याचे दिसत आहे. एकाच दिवसात मास्क न घालणाऱ्या 6474 लोकांकडून मुंबई पोलिसांनी दंड वसूल केला आहे.

मास्क न घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी दिले होते. अगदी काही दिवसांवर गणेशोत्सव आला असून रुग्ण संख्या पुन्हा वाढू नये म्हणून मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. मुंबईमध्ये 13 परिमंडळ आहेत. गणेशोत्सवाच्या दरम्यान प्रत्येक परिमंडळामध्ये स्थानिक पोलीस स्टेशन आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त एक विशेष पथक सुद्धा नेमण्यात येणार आहे. म्हणजेच मुंबईमध्ये 13 विशेष पथक पोलिसांकडून नेमण्यात येणार आहेत.

जे लोक गणेशोत्सवाच्या काळात मास्क घालणार नाही किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या नियमांचे पालन करणार नाही, त्यांच्यावर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल, असे नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई पोलिसांकडून गुरुवारी संपूर्ण मुंबईमध्ये मास्क न घालणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. दिंडोशी ते दहिसर पर्यंत असलेल्या परिमंडळ 12 मध्ये सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. येथे 719 लोकांकडून पोलिसांनी दंड आकारला आहे. तर काळाचौकी ते सायनपर्यंत असलेल्या परिमंडळ 4 मध्ये मास्क न घालणाऱ्या 666 जणांवर कारवाई करण्यात आली. तर परिमंडळ 6 मध्ये 646 जणांवर कारवाई करण्यात आली. चेंबूर ट्रॉम्बे हा परिसर परिमंडळ सहाच्या हद्दीत येतो. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आणि मध्यमवर्गीय वस्ती आहे.

परिमंडळ 5 मध्ये दादर, शिवाजी पार्क, माहीम, विनोबा भावे नगर, कुर्ला या परिसरांचा समावेश होतो. या ठिकाणी मास्क न घालण्याऱ्या 555 लोकांवर कारवाई करण्यात आली. परिमंडळ 2 मध्ये सुद्धा अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली. या परिमंडळात मास्क न घालण्याऱ्या 549 लोकांवर कारवाई करण्यात आली. परिमंडळ दोनमध्ये पायधुनीपासून ते मलबार हिलपर्यंत या परिसराचा समावेश होतो.

परिमंडळ तीनमध्ये भायखळा ते वरळी पर्यंतचा परिसर येतो. या ठिकाणी मास्क म घालणाऱ्या 542 लोकांवर कारवाई करण्यात आली. परिमंडळ सातमध्ये घाटकोपर पासून ते मुलुंड पर्यंतचा परिसर येतो. या ठिकाणी 553 जणांवर कारवाई करण्यात आली.

मुंबई पोलिसांकडून लोकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी घराबाहेर पडताना मास्क घालावा आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे नियम शासनाने आखून दिले आहेत, त्यांचे पालन करावे, अन्यथा त्यांना अशा कारवायांना सामोरे जावे लागेल.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:00 PM 04-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here