रत्नागिरी : मत्स्योद्योगाच्या विकासासाठी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. परंतु, या महामंडळाकडे निधी नाही. महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळास दरवर्षी 500 कोटी रु. ची आर्थिक तरतूद करून त्यास पूर्ण स्वायत्तता देण्यासाठी पाठपुरावा करून मत्स्य क्षेत्राच्या विकासाला चालना देऊ, असे आश्वासन राज्याचे मत्स्योद्योग विकासमंत्री महादेव जानकर यांनी दिले. मत्स्य क्षेत्रातील अशा विविध अडचणींवर चर्चा होऊन त्याचे निराकरण व्हावे व यातून मत्स्योद्योगाला चालना मिळावी यासाठी कोकण महाअंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्योद्योग विकासमंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी समृद्ध कोकण संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष संजय यादवराव, कोकण मत्स्योद्योग संघाचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, बाबा मोंडकर, मत्स्य तज्ज्ञ राजीव भाटकर, काशिनाथ तारी, महादेव निजाई, प्रसाद काठे आदी उपस्थित होते. कोकणातील मत्स्य क्षेत्राच्या विकासासाठी विविध मागण्या यावेळी मंत्री जानकर यांच्याकडे करण्यात आल्या. मत्स्यशेतीसाठी पुरेशा प्रमाणात मत्स्यबीज उपलब्ध होण्यासाठी उभारण्यात येणार्या हॅचेरीचे काम लवकरच पूर्ण होईल. कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात हॅचेरी स्थापन करण्यात यावी. ही समृद्ध कोकणची मागणी त्यांनी मान्य केली. या प्रमुख मागण्यासोबत कोळंबी शेती परवाना मिळवण्याच्या प्रक्रियेत सुलभता आणणे, मत्स्य शेतीला कृषीचा दर्जा देणे, समुद्रातील मासेमारीच्या शाश्वत विकासासाठी धोरण आखणे आदी विविध मागण्या यावेळी मंत्री महोदयांसमोर करण्यात आल्या. बैठकीत कोकणच्या मत्स्य क्षेत्राच्या विकासासंबंधी समाधानकारक चर्चा घडून आली.
