मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी संपादीत केलेल्या रत्नागिरी आणि संगमेश्वर दोन तालुक्यांमधील एकूण ३४ गावांसाठी वाढीव मोबदल्याच्या एकूण ४९ कोटी रकमेपैकी २६ कोटींचा मोबदला नुकताच जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून, उर्वरित २३ कोटी लवकरच मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात रत्नागिरी तालुक्यातील १२ आणि संगमेश्वर तालुक्यांतील २२ अशा एकूण ३४ गावांचा समावेश आहे. त्यापैकी रत्नागिरीतील चार आणि संगमेश्वरमधील सहा अशा एकूण दहा गावांचा निवाडा पहिल्या टप्प्यात, तर त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पुन्हा १९ गावांचा निवाडा जाहीर करण्यात आला. या सर्व २९ गावांसाठी शासनाकडून भरपाईची एकूण ३९७ कोटी ३ लाख ५४ हजार ८०२ इतकी रक्कम निश्चित करण्यात आली होती, या रकमेपैकी ३८१ कोटी रूपयांचा निधी मार्चमध्ये प्राप्त झाला आहे. यापैकी २०३,३३,७८,३८६ इतका निधी रत्नागिरी तालुक्यासाठी, तर १७८,५२,८०,६९७ एवढी रक्कम संगमेश्वर तालुक्यासाठी वितरीत करण्यात आली होती. रत्नागिरी तालुक्यातील पाली, पाली बाजारपेठ, चरवेली, कोठारेवाडी या चार गावांचा तसेच संगमेश्वरमधील निढळेवाडी अशा एकूण ५ गावांंचा निवाडा पुढे ढकलण्यात आला होता. त्यासाठी ९३,२२,८६,६२५ इतक्या रकमेची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ही रक्कमही देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही काही खातेदारांच्या जमिनीचे अधिक क्षेत्र या संपादनात गेल्याने त्यांनी फेर मोजणीसाठी निवेदन दिले होते. त्यानुसार त्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातील वाढीव मोबदल्याची ४९ कोटी इतकी रक्कम होत होती. त्यापैकी संगमेश्वर तालुक्यासाठी ३७ कोटी, तर रत्नागिरी तालुक्यासाठी १२ कोटी रूपयांचा वाढीव मोबदला जाहीर करण्यात आला होता. मात्र, हा निधीही रेंगाळला होता. त्यापैकी २६ कोटीचा निधी काही दिवसांपूर्वीच उपविभागीय कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे. त्यातील ५ कोटींचा निधी रत्नागिरीसाठी, तर २१ कोटींचा निधी संगमेश्वर तालुक्यात वितरीत करण्यात येणार आहे. उर्वरित २३ कोटींपैकी रत्नागिरीला ७ कोटींची, तर संगमेश्वरला १६ कोटींच्या निधीची अद्याप प्रतीक्षा आहे. हा निधीही लवकरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले. कोकण रेल्वेप्रमाणेच महामार्ग रूंदीकरणासाठी जागा देण्यालाही लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे कोठेही जागेअभावी काम थांबलेले नाही. काही किरकोळ ठिकाणीच वाद झाले.
