जिल्हा ग्राहक तक्रार मंचाच्या लिपिकास 21 हजारांची लाच घेताना अटक

0

अलिबाग येथील रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच न्यायालयात दाव्याची साक्षांकित प्रत देण्यासाठी मागितलेल्या 21 हजाराची लाच घेताना कार्यालयातील लिपिकास लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. प्रशांत मांडलेकर (वय – 28, रा. धोंडखार, रोहा) असे पकडलेल्या लिपिकाचे नाव आहे. अलिबाग लाच लुचपत विभागाने प्रशांत मांडलेकर यास अटक केली आहे. अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावर ग्राहक तक्रार निवारण मंच न्यायालय आहे. या न्यायालय कार्यालयात प्रशांत मांडलेकर हे लिपिक पदावर काम करीत होते. तक्रारदार यांचे ग्राहक न्यायालयात दावा सुरू असून दाव्याची साक्षांकित प्रत मिळण्यासाठी प्रशांत मांडलेकर यांच्याकडे अर्ज केला होता. मात्र अनेक दिवस गेले तरी मांडलेकर यांनी प्रत दिली नव्हती. त्यानंतर तक्रारदार हे मांडलेकर यांना भेटले असता साक्षांकित प्रत देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे मांडलेकर यांनी 21 हजाराची लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी मांडलेकर यांनी मागितलेल्या लाचेबाबत अलिबाग येथील लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. तक्रारदार हे लाचेची रक्कम लाचखोर मांडलेकर यांनी स्वीकारताना दबा धरून बसलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडून अटक केली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here