रत्नागिरी : अमावस्येला समुद्राला मोठी भरती असल्याने आधीच खवळलेल्या समुद्राच्या प्रचंड लाटा किनार्यावर धडकत आहेत. प्रचंड लाटांमुळे मिर्या ते पंधरामाड दरम्यानच्या बंधार्याला अनेक ठिकाणी भगदाडे पडली आहेत. पंधरामाड येथे तर दुसर्यांचा रस्ता वाहून गेला. समुद्राचे पाणी वस्तीत घुसू शकते या भीतीने येथील नागरिकांना रात्रभर जागता पहारा दिला. मात्र लाटांच्या मार्याने शेकडो किलोचे दगड वाहून गेले. भगवती बंदर येथे ब्रेकवॉटर वॉल बांधल्यापासून मिर्या बंधार्याचा प्रश्न गेली अनेक वर्ष सातत्याने पुढे येत आहे. पावसाळ्यात लाटांच्या मार्याने येथील नागरिक भीतीच्या छायेखालीच रात्र काढत असतात. उधाणाच्यावेळी प्रचंड आवाज करीत लाटा बंधार्यावर धडकत असल्याने, बंधाराच खिळखिळा झाला आहे. गेली अनेक वर्षे हा प्रश्न सातत्याने पुढे येऊनही त्यावर कायमस्वरूपी उपाय निघालेला नाही. या बंधार्याची वारंवार दुरुस्ती करूनही मिर्या ते पांढरा समुद्र पयर्ंतच्या बंधार्याचा धोका कमी झालेला नाही. पांढरा समुद्र ते पंधरा माड दरम्यान नव्याने झालेल्या रस्त्याला काही दिवसापूर्वी लाटांच्या मार्यामुळे भगदाड पडून, रस्ता वाहून गेला होता. त्यानंतर प्रशासनाने या रस्त्याची व बंधार्याची तात्पुरती डागडुजी केली. मात्र लाटांचा मारा सातत्याने बसल्याने या भागातील रहिवाशांना धोका कायम आहे. यावर्षी पावसात पंधरामाड येथील बंधारा तब्बल चारवेळ वाहून गेला आहे. सोमवारी रात्री अमावस्येच्यापूर्वी आलेल्या उधाणाने पंधरामाड येथील बंधार्याला मोठे भगदाड पडले आहे. रात्री आलेल्या भरतीसोबतच्या उधाणाने बंधार्याला भगदाड पडल्याचे समजताच नागरिकांनी किनारपट्टीवर धाव घेतली. बंधारा फुटण्याच्या भितीने नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढत, बंधार्यावर पहारा ठेवला. या घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली. मात्र मंगळवारी दुपारपर्यंत प्रशासनाचा एकही अधिकारी घटनास्थळी पोहचला नव्हता. परंतु बंधार्याला भगदाड पडले त्याठिकाणी छोटे दगड व खडी टाकून बंधार्याला पडलेला खड्डा बुजवण्याचे काम करण्यात येत होते. मोठे दगड येथे वाहून गेले त्याठिकाणी हे छोटे दगड व खडी कशी टिकणार असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता. भरतीच्यावेळी तर बंधारा पार करुन लाटांचे पाणी घुसत असल्याने नागरिकांमध्ये मात्र भितीचा छाया पसरली होती.
