अतिवृष्टीचा मुरूड तालुक्यातील 25 गावांना दणका

0

रायगड : गेल्या २४ तासांत एकट्या मुरूड तालुक्यात तब्बल ४७५ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. रात्रभर धुवाधार बरसणाऱ्या पावसामुळे मुरूडमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने २५ गावांतील घरांमध्ये पाणी शिरले हाेते. मच्छीमार बाेटीसह रस्ते खचून काही पूलही वाहून गेले आहेत. त्यामुळे वांदेली, काकळघर, आदड, चिकणी, विहूर, भोईघर आणि वांडेली या गावांचा संपर्क तुटला आहे. पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पावसाचा सर्वाधिक तडाखा हा मुरूड तालुक्याला बसला आहे. बोरली, मांडला, काकलघर, मुरूड, शिगरे, खतीब खार, आंबोली, सायगाव, वांदे, उंडर गाव, तेलवडे, खारीकवाडा, मजगाव, खरदोनकुळे, विहूर, मोरे, नांदगाव, काशीद, चिकणी, वालवती, आदाड, उसरोली, वेलास्ते, चोरधे, साळाव, अशा एकूण २५ गावांमध्ये अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरले हाेते. यामुळे गावातील एक हजार ५५० कुटुंबांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याशिवाय दुकाने, टपऱ्यांचेही नुकसान झाले आहे. रात्री भरतीसोबतच जोरदार पावसाने हजेरी दिल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. बोर्ली व मांडला येथील घरांत पाच ते सात फुटांपर्यंत पाणी होते. त्यामुळे मुरूडकरांना रात्र जागून काढावी लागली. मंगळवारी पावसाचा जाेर काहीसा कमी झाल्याने सकाळपासून पाणी ओसरायला सुरुवात झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
पावसाने चांगलीच दाणादाण उडवून दिल्याने पावसामुळे अलिबाग- मुरूड रस्त्यावरील विहूर गावाजवळ रस्ता एका बाजूने चांगलाच खचला आहे. त्यामुळे या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. पाऊस सुरू असताना समुद्रानेही राैद्ररूप धारण केले हाेते. त्यामुळे महाकाय लाटा उसळत असल्याने मुरूडमधील मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. किनारी भागात मच्छीमारांनी शाकारून ठेवलेल्या बोटी एकमेकांवर आदळून मच्छीमार बोटींची प्रचंड हानी झाली आहे. एकदरा समुद्रकिनारी नांगरून ठेवलेल्या बोटींचेही नांगर तुटले आहेत. समुद्रांच्या लाटांच्या माऱ्यामुळे त्या थेट मुरूडच्या समुद्र किनारी आल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले.
दरम्यान, मुरूडखालोखाल श्रीवर्धन तालुक्यात १५३ मि.मी., तर म्हसळा तालुक्यात १०५ मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५७ मि.मी. सरासरीने एकूण ९१२ मि.मी. पाऊस पडला आहे.
राेहा-मुरूड रत्यावर मध्यरात्री दरड काेसळल्याने या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात आली हाेती. पावसाचा जाेर थांबल्यानंतर सकाळी दरड हटवण्याचे काम हाती घेण्यात आले. दरड हटवल्यानंतर मार्गावरून वाहतूक सुरू झाली आहे. -सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:47 AM 08-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here