मुंबई : राज्यात अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर धनगर समाज बांधवांसाठी 13 नवीन योजना सुरु करण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. हा समाज आरक्षणाची मागणी करत असतानाच विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारने हा निर्णय जाहीर केला. धनगर समाजाच्या सहकारी सूत गिरण्यांना भागभांडवल, पावसाळ्यात चराई अनुदान, शहरांमध्ये वसतिगृह, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन इत्यादी योजनांचा त्यात समावेश आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कामगार आणि मागास वर्गीयांसाठीच्या स्वतंत्र खात्याचे मंत्री डॉ. संजय कुटे यांनी ही माहिती दिली. डॉ. कुटे म्हणाले, आदिवासी विभाग तसेच विविध प्रशासकीय विभागांच्या 16 योजनांचा लाभ धनगर समाजातील घटकांना मिळत आहे. या योजना वगळून अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर 13 योजना धनगर समाजासाठी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनांसाठी 2019-20 या चालू आर्थिक वर्षात 1000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.त्यापैकी 500 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पातच करण्यात आली आहे.
