सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या वाढवणार

0

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या वाढवण्यात येणार आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  न्यायमूर्तींची संख्या वाढविण्यासाठी संसदेत विधेयक आणण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयाबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या (सरन्यायाधीश वगळता) 30 वरुन 33 करण्यावर केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकमत झाले. त्यानंतर याबाबतचे विधेयक संसदेत मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2016 मध्ये एनडीए सरकारने उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या 906 वरुन 1079 केली होती. ‘सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात ४३ लाखांहून अधिक खटले प्रलंबित आहेत. या प्रलंबित खटल्यांचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या वाढवावी आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्त वय ६२ वरून ६५ वर्षापर्यंत वाढविण्याची मागणी सरन्यायाधीश गोगोई यांनी केली होती. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. सर्वोच्च न्यायालयात ५८,६६९ तर देशातील २४ उच्च न्यायालयात ४३ लाख खटले प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयात एका दशकाहून अधिक काळापासून खटले प्रलंबित आहेत. त्यात नवीन खटले दाखल होत असल्यामुळे प्रलंबित खटल्यांची संख्या वाढत आहे, असे सरन्यायाधीश गोगोई यांनी म्हटले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here