कोरोना व्हायरस: भारताकडून चीनला मदतीचे आश्वासन

0

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत आहे. चीनमध्ये या रोगाच्या संक्रमणामुळे 900 पेक्षा जास्त जणांचा बळी गेला असून 37 हजारपेक्षा जास्त जणांना याची लागण झाली आहे. तसेच या रोगाचे संक्रमण जगभरात झपाट्याने फैलावत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना पत्र लिहून मदतीचा प्रस्ताव दिला होता. पंतप्रधानांच्या या पत्रावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी दिलेला मदतीचा प्रस्ताव भारत -चीनमधील प्रगाढ मैत्री दर्शवतो, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. हिंदुस्थानने दिलेल्या मदतीच्या प्रस्तावासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो, असेही चीनने म्हटले आहे. आम्ही भारतासह जगभरातील सर्व देशांच्या सहकार्याने या संक्रमणावर मात करू असा विश्वासही चीनने व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शी जिनपिंग यांना पत्र लिहून कोरोनामुळे चीनमध्ये झालेल्या जीवितहानीबाबत शोक व्यक्त केला होता. तसेच हिंदुस्थानकडून सर्वतोपरी मदत देण्याचा प्रस्तावही चीनसमोर ठेवला होता. चीनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी चीनने केलेल्या प्रयत्नांचीही मोदी यांनी प्रशंसा केली होती. चीनमध्ये 300 पेक्षा जास्त हिंदुस्थानी विद्यार्थी अडकले होते. त्यांना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने सुरक्षित मायदेशी आणण्यात आले आहे. चीनमधील हिंदुस्थानी नागरिकांना एअर इंडियाच्या दोन विमानांनी देशात परत आणण्यात आले असून त्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. चीन कोरोना संक्रमणाशी झुंज देत आहे. अनेक देशांनी चीनकडे होणारी हवाई उड्डाणे रद्द केली आहेत. अशा परिस्थितीत भारताने दिलेला मदतीचा प्रस्ताव आमच्यासाठी महत्त्वाचा असून हा प्रस्ताव दोन्ही देशातील दृढ मैत्री दर्शवतो, असे चीनने म्हटले आहे. तसेच हिंदुस्थानने दिलेल्या या प्रस्तावाबाबत त्यांनी आभारही व्यक्त केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here