शेवाळवाडी – म्हासोली( ता. कराड) येथील रयत सहकारी साखर कारखान्याचे बगँसचे टेंडर उंडाळे येथील मारुत शेवाळे यांचे सांगली येथील नातेवाईकाकडे आहे. सदर ठेकेदाराचा कर्मचारी हा व्यवहारासाठीचे 2 लाख रुपये घेऊन सांगलीकडे घाईगडबडीने निघाले असता पैशांनी भरलेली बॅग बांदेकरवाडी (सवादे) येथे रस्त्यात पडली. त्याच वेळी स्वा. दादा उंडाळकर विद्यालयाचे बारावीचे विद्यार्थी दीपक रामिष्ठे रविंद्र मोहिते, सिद्धनाथ मस्कर हे तिघे प्रॅक्टिकल परीक्षा देऊन घरी निघाले असता, त्यांना रस्त्यात पडलेली बेवारस बॅग दिसली. त्यांनी ही बॅग हातात घेऊन पाहिले असता बॅग पैशाने भरल्याचे आढळून आले. पैशाने भरलेली बॅग पाहून कोणत्याही मोहाला बळी न पडता विद्यार्थ्यांनी थेट पोलीस उंडाळे दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार काळे आणि महिला पोलिस चव्हाण यांच्या ताब्यात पैशाची बॅग सुपूर्द केली. पैशाची मोजणी करून त्यामध्ये असलेल्या पत्त्यावर व मोबाईल नंबरवरून संबंधित बॅग मालकाला फोन करून सांगण्यात आले. त्याचवेळी संबंधित मालकाने बँग आपली असल्याचे सांगितले. खातरजमा झाल्यानंतर बॅग मालकाने या बॅगमधील 20 हजार रुपये तीन विद्यार्थ्यांना द्यावेत, असे पोलिसांना व नातेवाईक मारुती शेवाळे यांना सांगितले. संबंधित विद्यार्थ्यांना 20 हजार रुपये व एक किलो मिठाईचे बॉक्स देऊन त्यांचा सत्कार केला. या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
