15 व्या वित्तच्या निधीसाठी ग्रामपंचायतींना आयसीआयसीआय बँकेत खाते काढावे लागणार

0

रत्नागिरी : 15 व्या वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना वितरित करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेत बचत खाते उघडण्याची सक्ती ग्रामपंचायतींना करण्यात आली आहे. गावपातळीवर संबंधित बँकेच्या शाखा कार्यरत नसताना आणि सध्या अन्य बँकेत खाती उघडली असताना आयसीआयसीआय मध्येच बचतखाते उघडण्याची सक्ती कशासाठी, असा सवाल उपस्थित करत काही ग्रामपंचायतींनी या निर्णयास विरोध दर्शविला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार जिल्हा परिषद व ग्रामपंचायत स्तरावरील विविध प्रकल्प, योजनांमधील कंत्राटदार व इतर लाभार्थी यांना निधीचे वितरण ऑनलाईन पध्दतीने करून निधी वितरणाची प्रक्रिया डिजिटल व कॅशलेस पध्दतीने करण्याचे शासनाने धोरण आहे. या धोरणाच्या अनुषंगाने केंद्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणाऱ्या 15 व्या वित्त आयोगाचा निधी पीएफएमएस प्रणालीवरून वितरित करणे बंधनकारक केले आहे. तसेच हा निधी थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने आयसीआयसीआय बँक पीपीआयसाठी हँड होल्डिंग सपोर्ट देण्यास बँक तयार असल्याने केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने कळविले आहे. 15 व्या वित्त आयोगाचा निधी वेळेवर खर्च होत नसल्याने लोकप्रतिनिधींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याचा विचार करून राज्यात केंद्र शासनाच्या डीबीटी धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 15 व्या वित्त आयोगांतर्गत राज्याला प्राप्त होणाऱ्या निधीचे, जिल्हा परिषदेला 10 टक्के, पंचायत समितीला 10 टक्के व ग्रामपंचायतीला 80 टक्के या प्रमाणे वाटप होते. केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार 15 व्या वित्त आयोगाच्या निधीचे वाटप ग्रामपंचायतींना राज्यशासनाकडून थेट होणार आहे. तसेच हा निधी पीपीआयद्वारे वितरित करणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी आयसीआयसीआय बँकेचे बचत खाते उघडण्यास सांगितले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना ग्रामविकास विभागाने आदेश काढले असून पुढील पंधरा दिवसांत आयसीआयसीआय बँकेत खाते उघडण्यास सांगितले आहे. दरम्यान, या निर्णयास काही ग्रामपंचायतींनी विरोध दर्शविला आहे. गाव पातळीवर या बँकच्या शाखा नाहीत. शिवाय अन्य बँकेत खाती उघडण्यात आली आहेत. आयसीआयसीआय बँकेत बचत खाते उघडण्याची सक्ती कशासाठी असा सवाल पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:42 PM 20-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here