लांजा: प्रवाशांना सोडायला गेलेल्या रिक्षाचालकाच्या अंगावर झाड कोसळल्याने भांबेड येथील रिक्षाचालक अनिल यशवंत मिरजकर हे जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना सोमवारी स. ९ वा. च्या सुमारास विलवडे अनिल मिरजकर खामकरवाडी येथे घडली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले अनिल यशवंत मिरजकर (वय ४२, रा. भांबेड-पेठदेव) हे सकाळी आपल्या रिक्षाने विहिरीवर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन सोडायला विलवडे येथे गेले होते. विलवडे-खामकरवाडी येथे याठिकाणी विहिरीचे काम सुरू आहे. रिक्षातून नेलेले मजूर कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर रिक्षाचालक मिरजकर हे विहिरीच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या कळशीतील पाणी पिण्यासाठी गेले. तेथे पाणी पित असतानाच अचानक शेजारी अर्धवट तोडून ठेवलेले सुकलेले फणसाचे झाड त्यांच्या डोक्यावर पडले. भलेमोठे झाड अचानक अंगावर कोसळल्याने मिरजकर रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्याक्षणी त्या ठिकाणी आलेल्या सर्व मजुरांनी व ग्रामस्थांनी त्यांना ओणी प्रा. आ. केंद्रात उपचारासाठी नेले. मात्र, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मिरजकर यांना मृत घोषित केले.
