जागतिक पातळीवर खवले मांजर अत्यंत धोक्यात आहे. खवले मांजराचे गाव म्हणून ओळख असलेल्या चिपळूण तालुक्यातील डुगवे गावात खवलोत्सव साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. १५ फेब्रुवारी रोजी डुगवे येथील ग्रामदेवतेच्या मंदिरात सारे ग्रामस्थ एकत्र जमून हा उत्सव साजरा करणार आहेत. यावेळी ग्रामस्थ खवले मांजराची प्रतिकृती पालखीत घालून नाचवणार आहेत. जगातील अशा प्रकारचे हे पहिलेच गाव आहे जेथे खवले मांजराला देवाचे स्थान देऊन ग्रामस्थ त्याच्या संरक्षणासाठी एकवटले आहेत. सह्याद्री निसर्ग मित्र संस्था गेली ४ वर्षे कोकणात खवले मांजर संरक्षण संवर्धन प्रकल्प राबवत आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती, प्रत्यक्ष खवले मांजराचा अभ्यास, संशोधन व प्रत्यक्ष संरक्षण असे काम सुरू आहे. खवले मांजर हा निसर्ग साखळीतील एक महत्त्वाचा खवले धारी प्राणी असून, त्याचे संरक्षण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जागतिक खवले मांजर दिनाच्या दिवशी १५ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १०.३० वाजता डुगवे ग्रामस्थ ग्रामदेवता मंदिरात जमणार आहेत. यामध्ये पुरुष, महिला, विद्यार्थी या सर्वांचा समावेश असणार आहे.खवले मांजराची प्रतिकृती जंगलातून मंदिरात आणण्यात येईल. तेथे विधीपूर्वक पूजा करण्यात येईल. परंपरेप्रमाणे खवले मांजराच्या जागतिक पातळीवर संरक्षण, संवर्धनासाठी गाऱ्हाणे, आरज घालण्यात येईल. मग मांजराला पालखीत घालून सहाणेवर गावकरी पालखी नाचवतील. नंतर पालखी ग्रामस्थांच्या घरा-घरात जाईल व तेथे लोक त्याची पूजा करतील. परत पालखी देवळात येईल, नंतर महाप्रसाद होऊन उत्सवाची सांगता होणार आहे.
