सिंधुदुर्गसाठी निळेली येथे शासकीय कृषी महाविद्यालयासाठी मंजुरी द्यावी : खासदार विनायक राऊत

0

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निळेली (ता.कुडाळ) येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी मिळावी तसेच दापोली कृषी विद्यापीठातील कृषिविद्या विभाग प्रमुख आणि इतर दोन प्राध्यापक पदे राहुरी विद्यापीठात वर्ग न करता दापोली कृषी विद्यापीठातच कायम ठेवावीत, अशी मागणी शिवसेनेचे सचिव, संसदीय गटनेते तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. खा. विनायक राऊत यांनी मंगळवारी भुसे यांची मुंबई येथे भेट घेत या दोन्ही विषयांबाबत चर्चा केली.

महाराष्ट्र शासनाने 1997 मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला असून पर्यटनावर आधारित नवनवीन उद्योग निर्मितीच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. निसर्ग सौंदर्याने आणि जैवविविधतेने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाबरोबरच कृषी विकासालाही मोठा वाव आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि सुधारित बियाण्याच्या माध्यमातून कृषी क्षेत्राकडे शेतकऱ्यांचा कल असल्याने जिल्ह्याचा कृषी उत्पादनाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र शासनाच्या लहान मोठ्या 16 पाटबंधारे प्रकल्पांद्वारे जिल्ह्यात सुमारे 80 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून भविष्यामध्ये कुडाळ व सावंतवाडी तालुक्यातील 63 गावातील 18 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय कृषी महाविद्यालयाची गरज शेतकरी वर्गाकडून व कृषी अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.
अलीकडेच महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक शासकीय कृषी महाविद्यालय निर्मितीचे धोरण अवलंबिले असून सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही शासकीय कृषी महाविद्यालय नाही. नवीन शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सोईसुविधा जसे की, जमीन, पाणी, वीज, पशुधन इत्यादी संशोधन केंद्र मिळेली. निळेली येथे शासकीय कृषी महाविद्यालय झाल्यास माणगाव (कुडाळ) खो-यातील डोंगराळ व दुर्गम प्रदेशाच्या विकासासाठी योग्य दिशा मिळेल. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात कोकणातील तरुण वर्ग नोकरीसाठी मुंबई, पुण्याकडे न जाता शेतीकडे वळताना दिसत असून त्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान पुरविण्यासाठी या कृषी महाविद्यालयाची भूमिका महत्त्वाची ठरू शकेल अशी खात्री आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थिती विचारात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी निळेली येथे शासकीय कृषी महाविद्यालय निर्मितीसाठी प्रशासकीय मंजूरी मिळावी अशी मागणी राऊत यांनी यावेळी केली आहे.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषीविद्या विभागप्रमुख पद व त्यासोबत आणखी दोन ते तीन प्राध्यापक पदे राहुरी कृषी विद्यापिकात वर्ग करण्यासंबंधी हालचाली सुरू झाल्या आहेत. दापोली कृषी विद्यापीठाची स्थापना कोकणातील जैवविविधता, अतिपर्जन्यमान आणि उष्ण-दमट हवामान विचारात घेऊन येथील शेतक-यांसाठी उपयुक्त असे शिक्षण व संशोधन सुरू करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेली आहे. कोकणात पिकणारी भात, नाचणी, कडधान्ये कृषी विषयक पिके जरी व्यापारी पिके नसली तरी कोकणातील सामान्य शेतकन्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मागील 50 वर्षाच्या काळामध्ये कोकण विभागाचे भातपिकाचे वार्षिक उत्पादन 10 लाख टनावरून 16 लाख टनापर्यंत तर हेक्ट सरासरी उत्पादन 2.3 टनावरून 4.3 टनावर पोहोचले आहे.
इतर कृषी पिकांच्या उत्पादनातही कोकणातील शेतकरी निश्चितच चांगली प्रगती केली आहे. या उत्पादन वाढीसाठी आवश्यक सुधारित तंत्रज्ञान उपलब्ध देण्यात कृषी विद्यापीठाच्या कृषीविद्या विभागाची मोलाची भूमिका राहिली आहे. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संरचना करताना आवश्यकतेनुसार मनुष्यबळ प्रत्येक विद्यापीठास देण्यात आले आहे. त्यामुळे 2021-22 या वर्षी कोकण कृषी विदयापीठ सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना अशा प्रकारे कृषिविद्या या अतिशय महत्त्वाच्या विभागाचे विभागप्रमुख पद व इतर तीन-चार प्राध्यापक पदे अन्य विद्यापीठाकडे वर्ग करणे म्हणजे विद्यापीठावर किंबहुना संपूर्ण कोकणावर अन्याय केल्यासारखे होईल. कोकण कृषि विद्यापीठाकडून कमी मनुष्यबळामुळे यापूर्वीच दोन पीएचडी अभासक्रम बंद केले असताना नव्याने कृषि विद्या विभागप्रमुख व प्राध्यापक पदे इतरत्र वर्ग केल्यास कृषिविद्या व तत्सम विषयातील शिक्षण व संशोधन कार्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोकणातील शेतकरी जनतेच्या भावनेचा आदर करून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कृषिविद्या विभागप्रमुख व इतर कोणतेही प्राध्यापक पद इतरत्र वर्ग करण्यात येऊ नयेत, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी कृषीमंत्री भुसे यांच्याकडे केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:26 AM 22-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here