रस्ते अपघात टाळण्यासाठी ट्रकमध्ये स्लीप डिटेक्शन सेन्सर्स लावण्याचे नितीन गडकरींचे निर्देश

0

नवी दिल्ली : दरवर्षी देशभरात मोठ्या प्रमाणात होणारे रस्ते अपघात हा प्रशासनासाठी मोठा चिंतेचा विषय आहे. जीवितहानी या अपघातांमध्ये होत असल्यामुळे त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवे आदेश दिले असून त्यानुसार ट्रक चालकांच्या चुकांमुळे किंवा त्यांना ट्रक चालवताना डुलकी लागल्यामुळे होणाऱ्या अपघातांना यामुळे आवर घालण्यास मोठी मदत होणार आहे. नितीन गडकरींनी हे आदेश राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये दिले आहेत. तसेच, सर्व राज्य सरकारे आणि जिल्हाधिकाऱ्यांना देखील त्यासंदर्भात निर्देश दिले जातील, असेही गडकरींनी यावेळी सांगितले. नितीन गडकरींनीच रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी राष्ट्रीय रस्ते सुरक्षा गटाची स्थापना केली आहे. तसेच, या गटाची दर दोन महिन्यांनी बैठक होते आणि त्यात संभाव्य योजनांवर चर्चा होते. मंगळवारी झालेल्या या गटाच्या बैठकीमध्ये नितीन गडकरींनी ट्रकमुळे होणाऱ्या अपघातांवर तोडगा काढण्यासाठी अभिनव संकल्पनेवर चर्चा केली असून त्यासंदर्भात प्रशासनाला निर्देश देखील दिले आहेत. लांब पल्ल्याचे प्रवास करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालवाहू ट्रकचालक माल वाहून नेत असतात. त्यामुळे या प्रवासादरम्यान त्यांना डुलकी लागण्याची देखील शक्यता असते. अशाच काही प्रकरणात मोठे अपघात झाल्याचे देखील दिसून आल्यामुळेच ट्रकचालकांना डुलकी लागू नये, यासाठी देशातील सर्व व्यावसायिक वापराच्या ट्रकमध्ये On-Board Sleep Detection Sensors अर्थात चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार आहेत. त्यामुळे अशा प्रकारांचे प्रमाण कमी होऊ शकेल. देशातील विमान व्यवसायामध्ये पायलटच्या विमान उड्डाणाचे तास ज्या प्रमाणे निश्चित असतात, त्याचप्रमाणे ट्रकचालकांचे देखील ड्रायव्हिंगचे तास निश्चित करण्याचे निर्देश यावेळी नितीन गडकरी यांनी दिले आहेत. त्यामध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून जिल्हा रस्ते समितीच्या नियमित बैठका होतील, याची काळजी घेण्याचे निर्देश देणार असल्याचे गडकरींनी सांगितले. तसेच, ट्रक चालकांसाठी ड्रायव्हिंगचे तास देखील निश्चित करण्याचे निर्देश या पत्रांमधून देणार असल्याचे गडकरींनी सांगितले. दरम्यान, देशभरातील रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी व्हायला हवी, हे स्पष्ट करतानाच नितीन गडकरींनी या बैठकीमध्ये रस्ते सुरक्षा गटाच्या सदस्यांना यासंदर्भात लवकराच लवकर धोरण तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:47 PM 22-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here