प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनची तीन पट व्यवस्था करावी : राजेश क्षीरसागर

0

नाशिक : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य सुविधांसह जिल्ह्यात ऑक्सिजनची तीन पट व्यवस्था करण्यात यावी, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात नाशिक महसूल विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांची आढावा बैठक राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

क्षीरसागर पुढे म्हणाले की, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानुंषगाने बालकांसाठी आयसीयु बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन व इतर आवश्यक बाबींची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हा वार्षिक योजना व नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करतांना प्रथम प्राधान्य कोविड विषयक बाबींना देण्याबरोबरच जनतेच्या हिताच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच कायमस्वरुपी मालमत्ता तयार होऊन त्याचा फायदा अनेक वर्ष होईल अशा स्वरुपाची विकास कामे जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून घेण्यात यावी,अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येची वाढ रोखण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, असेही क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा सामना नाशिक विभागाने सक्षमपणे केला असल्याचे सांगून क्षीरसागर यांनी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, महसूल आणि पोलीस विभाग, स्वयंसेवी संस्था, विविध शासकीय विभाग आणि पत्रकारांनी कोरोना लढ्यात चांगली कामगिरी केल्या बद्दल आभार व्यक्त केले. तसेच ज्या कोरोना रुग्णांना उपचारासाठी वाढीव बील आकारणी झाली असेल त्या बिलांची पुन्हा लेखा परिक्षण करण्यात येवून त्यांना कोरोना विषयक असलेल्या वैद्यकीय योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात उद्यान स्मारक उभे करून यामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी, व्यंगचित्र केंद्र, ओपन जीम, कलादालन, जिल्ह्यातील प्रसिध्द खाद्य पदार्थांचे स्टॉल अशा सर्व समावेशक बाबींचा त्या उद्यान स्मारकात समावेश करण्यात यावा. सदर उद्यान स्मारकाचे विकासकाम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करावे, असे क्षीरसागर यांनी सांगितले यावेळी सन २०१८ ते सन २०२०-२१ या वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच २०२०-२१ व सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेमधून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत झालेल्या कामांचा आणि खर्चाचा जिल्हानिहाय व यंत्रणानिहाय क्षीरसागर यांनी आढावा घेतला. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक विभागाचा जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या कामांची माहिती दिली. तसेच प्रत्येक जिल्ह्यात करण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पांची व त्यामाध्यमातून निर्माण होणाऱ्या ऑक्सिजन क्षमतेची माहिती दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:13 PM 23-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here