एकात्मिक बालविकासतर्फे करबुडे येथे राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम

0

रत्नागिरी : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी २ मधील बीट जाकादेवी १ अंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियान पोषण माह कार्यक्रम करबुडे ग्रामपंचायत येथे शनिवार दि. २५ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने यांनी भुषविले. यावेळी सुरुवातीला सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पोषण माहचे फायदे व महत्त्व अधोरेखित करण्यासाठी यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मुलींच्या जन्माचे स्वागत, डोहाळे जेवण, पाककृती स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सुदृढ बालक स्पर्धा तसेच महिलांचे गुणदर्शनात्मक कार्यक्रम सादर करण्यात येवून स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष पदावरून आपले विचार व्यक्त करताना उदय बने यांनी लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण तसेच बालहक्क संरक्षण कायद्याबाबत माहिती दिली. बालकांना सुदृढ बनवितानाच त्यांना सुसंस्कृत बनविणेही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. रान भाज्यांचे महत्त्व विशद करून पोषण माहचा हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य उपक्रम असून आपल्याला आजचा कार्यक्रम आवडल्याचे सांगतानाच या कार्यक्रमाचे नियोजन करणा-यांचे त्यांनी कौतुक केले. शेवटी मृत्यू हे अंतिम सत्य असून ते स्विकारुन सर्वांनी आनंदाने, सुखाने जगू या असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी इतर मान्यवरांनी ही समयोचित भाषणे केली. या कार्यक्रमास बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीम. ए. एन. मालगुंडकर, करबुडे ग्रा. पं. सरपंच हर्षला वेदरे, उपसरपंच स्नेहल शितप, पर्यवेक्षिका श्रीम. एस. एम. पालकर, पोलीस पाटील हरिश्चंद्र वेदरे, ग्रा. पं. सदस्य महादेव पाचकुडे, रोशनी जाधव, अनंत कारकर, समिक्षा गोताड जाकादेवी प्रा. आ. केंद्राच्या श्रीम. शिंदे, जाकादेवी १ च्या सर्व अंगणवाडी सेविका व परिसरातील गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षिका श्रीम. पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अंगणवाडी सेविका यांनी केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:21 AM 27-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here