15 व्या वित्त आयोगातून जिल्ह्याला 29 कोटी रुपये अनुदान प्राप्त

0

रत्नागिरी : 15 व्या वित्त आयोगातून २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेला एकूण २९ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. या निधीतून जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विकास साधला जाणार आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार या अनुदानाचा वापर पायाभूत सुविधांसाठी करावयाचा आहे. त्यामध्ये स्वच्छता आणि हागणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थिती कायम राखणे, तसेच देखभाल दुरुस्ती करणे, पेयजल पाणीपुरवठा, जल पुनर्भरण, पावसाच्या पाण्याची साठवण यासाठी खर्च करावयाचा आहे. या निधीचे जिल्हा परिषदेला १० टक्के, पंचायत समितीला १० टक्के आणि जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना ८० टक्के या प्रमाणात निधी वितरित करण्यात आला आहे. जिल्ह्यात ९ पंचायत समित्या असून, ८४६ ग्रामपंचायती आहेत. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत स्तरावरील पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत विविध प्रकल्प, योजनामधील कंत्राटदार व इतर लाभार्थ्यांना निधीचे वितरण ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच पीएफएमएस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक आहे, अशी सूचना शासनाकडून देण्यात आली आहे. हा निधी वितरित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना आयसीआय बँकेत खाते उघडण्याचे तसेच जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींचे तालुकानिहाय मेळावे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 15 व्या वित्त आयोगामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना भरघोस निधी मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विकासकामांवर ग्रामपंचायतींनी जास्तीत जास्त भर द्यावा, अशीही सूचना देण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:37 PM 27-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here