महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्राचा मास्टरशेफ’ स्पर्धेच्या अव्वल स्थानाचे मानकरी ठरले रत्नागिरीचे गिरीश शितप !

0

◼️ कोकणातील गावांमधील पारंपारिक पानगा पाककृती ठरली महाराष्ट्रात अव्वल

◼️ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गौरव

रत्‍नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या राज्य पर्यटन मंडळाअंतर्गत महाराष्ट्राचा खाद्य संस्कृतीची ओळख, इतिहास जपण्यासाठी महाराष्ट्राचा मास्टरशेफ ही स्पर्धा पारंपारिक महाराष्ट्रीयन पाककृतीवर आधारित घेण्यात आली होती. हजारोंच्या संख्येने या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून सहभाग नोंदवला होता. यामध्ये रत्नागिरीतील झरेवाडी गावचे रहिवासी गिरीश शितप आणि त्यांची टीम यांनी तळकोकणातील गावांमधील 50 ते 60 वर्ष जुनी, पौष्टिक, स्वास्त पूरक, पारंपारिक पानगा पाककृती क्रिएटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून सादर केली होती. या स्पर्धेमध्ये ही पाककृती सर्वोत्तम ठरली. रेडी टू कूक आणि फास्ट फूडच्या आजच्या जमान्यामध्ये आपली पारंपारिक चव आणि खाद्यसंस्कृती लुप्त होत चालली आहे. हीच पारंपारिक चुलीवरची चव व ग्रामीण खाद्यसंस्कृती जपण्याचा प्रयत्न झरेवाडी गावरान मसाला या दालनाच्या माध्यमातून गिरीश शितप आणि त्यांची टीम करत आहे. महाराष्ट्र शासनाची ही स्पर्धा जाहीर झाल्यानंतर आपल्या गावातला आणि कोकणातला अस्सल पारंपरिक अप्रतिम चवीचा पानगा या स्पर्धेच्या माध्यमातून अधिकाधिक पर्यटक आणि लोकांपर्यंत पोहोचावा या हेतूने यांनी सहभाग नोंदवला होता. या पाककृतीला या स्पर्धेच्या अव्वलस्थानी निवड करून गौरविण्यात आले याबद्दल गिरीश शितप यांनी समाधान व्यक्त केले व महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचा मास्टरशेफ या व्यासपीठाच्या माध्यमातून अशा पारंपारीक पाककृती जपण्याची आणि संवर्धनाची संधी उपलब्ध करून दिली याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. या स्पर्धेत पाककृती सोबत क्रिएटिव्ह व्हिडिओ सादर होणे अपेक्षित होते. सदर पाककृतीचे क्रिएटिव्ह आणि सिनेमॅटिक व्हिडिओ बनविण्याचे संपूर्ण श्रेय रत्नागिरीतील छायाचित्रकार ज्ञानेश कांबळे आणि संकलनकार भूषण बागुल या उमद्या हरहुन्नरी युवकांना जाते. दर्जेदार फुटेज मिळवणे आणि तितक्याच उत्तम पद्धतीने संकलन करणे व स्पर्धेच्या नियमानुसार व्हिडीओ बनविणे हे आव्हान होते, हे आव्हान पेलत या दोघांच्या मेहनतीमुळे पारंपरिकता जपत पानगा पाककृती अप्रतिम पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून या स्पर्धेत सादर झाली. या स्पर्धेतील सहभागासाठी श्री. ताराचंद ढोबळे आणि शेफ मेघना शेलार यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले. या सर्वांच्या टीमवर्क मुळेच हे यश मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया गिरीश शितप यांनी व्यक्त केली. आणि सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:08 AM 28-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here