आंगणेवाडी: दिव्यांग व वयोवृद्ध भाविकांसाठी थेट रिक्षा व्यवस्था

0

17 फेब्रुवारीला होणाऱ्या आंगणेवाडी वार्षिकोत्सवाची जय्यत तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबीयांनी विशेष नियोजन केले आहे. कमीतकमी वेळेत दर्शन घेण्यासाठी नऊ रांगांची व्यवस्था करण्यात आली असून दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांग असणार आहे. तसेच दिव्यांग व वयोवृद्ध भाविकांना मंदिरापर्यंत आणण्यासाठी मालवण व कणकवली या वाहनतळ ठिकाणावरून रिक्षा व्यवस्था थेट मंदिरापर्यंत करण्यात आली आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यात्रोत्सवात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नियोजन व तयारी सुरू असल्याचे आंगणे कुटुंबीयांनी सांगितले.आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिकोत्सव 17 फेब्रुवारी रोजी होत आहे. यानिमित्ताने भराडी मंदिर परिसराचा आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आढावा घेण्यात आला. यावेळी अध्यक्ष भास्कर आंगणे, सचिव मधू आंगणे, कार्याध्यक्ष प्रकाश आंगणे, बाबू आंगणे, दीपक आंगणे, नंदकुमार आंगणे आदी उपस्थित होते. ‘भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून व्हीआयपी व्यक्तींच्या दर्शनावेळी भाविकांना दर्शनात कोणताही खंड पडणार नाही याचीही दक्षता आंगणे कुटुंबीय आणि प्रशासन घेणार आहे. यात्रोत्सवासाठी रेल्वेने येणाऱ्या भाविकांना रेल्वे स्थानकावरून जादा एसटी बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. व्यापाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची, लाईट व्यवस्था आंगणे कुटुंबीयांच्यावतीने करून देण्यात आली आहे, असे स्पष्ट करण्यात आले. श्री भराडी देवीच्या दर्शनाला 17 फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजल्यापासून सुरुवात होईल. त्यानंतर रात्री 9 ते 1 या चार तासाच्या कालावधीत आंगणे कुटुंबीयांचे मंदिरात धार्मिक विधी पार पडतील. मध्यरात्री 1 नंतर दर्शन, ओटी भरणे आदी कार्यक्रम पूर्ववत सुरू होतील. भाविकांनी कमीतकमी वेळेत समाधानाने दर्शन घ्यावे, अशी आमची भूमिका आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here