खेड मधील ४०१ पूरग्रस्त बाधित कुटुंबांना धान्य, केरोसीनचे नियोजनबध्द वाटप

0

खेड : २२ जुलैच्या अतिवृष्टीमुळे आलेला पूर तसेच कोसळलेल्या दरडींचा फटका तालुक्यातील १८ गावांतील ४०१ कुटुंबांना बसला. त्यांना शासनाने जाहीर केलेले धान्य व केरोसीनचे येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने नियोजनबध्दरित्या पुरवले. त्यामुळे पूरग्रस्तांची चूल पेटली असून भूकही भागली. पूर व दरडी कोसळून बाधित झालेल्या कुटुंबांना दर महिन्याला मिळणाऱ्या नियमित व जादा धान्याव्यतिरिक्त मोफत धान्य व केरोसीन देण्याची घोषणा शासनाने केली होती. अतिवृष्टीच्या संकटात जीवन सुलभरित्या जगण्यास प्रशासनाने पुढे केलेला मदतीचा हात पूरग्रस्तांना मोठा दिलासादायक ठरला. अतिवृष्टीमुळे जगबुडी, चोरद, नारिंगी नदीचा महापूर ३२ तासांनी ओसरला होता. याचा फटका शहरातील बाजारपेठेसह नदीलगतच्या गावांतील घरांना बसला. तसेच तालुक्यात ठिकठिकाणी कोसळलेल्या दरडींमुळे अनेक कुटुंबांना नुकसान सहन करावे लागले. अतिवृष्टीमुळे वित्तहानीसह मोठ्या प्रमाणात जीवितहानीही झाली. अतिवृष्टीत तालुक्यातील १८ गावांतील ४०१ बाधित कुटुंबांना पूरग्रस्त म्हणून तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून यामध्ये ८३.६ क्विंटल धान्य व २००५ लिटर केरोसीनवाटप करण्यात आले. यामध्ये अलसुरे गावातील सर्वाधिक बाधित कुटुंबांना धान्याचे वितरण करण्यात आले. तालुक्यातील शिरगावमधील ६३, आंबवलीतील १२, सनघर-२, आष्टी- १६, मेटे- २, सुकिवली- १५, अलसुरे- १३४, खोपी- १३, सवणस-१, कोतवली-५, केळणे- १३, बोरघर-२१, धवडे- २७, कर्जी-११, धामणंद-६, कावळे- ३, पोसरे- ५६, तर खवटीमधील एका बाधित कुटुंबाचा समावेश आहे. पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला तांदुळ १० किलो, गहू १० किलो, तुरडाळ ५ किलो व ५ लिटर केरोसीनचे वाटप करण्यात आले. यासाठी तांदुळ ४०.१ क्विंटल, गहू ४०.१ क्विंटल, तुरडाळ ३.४० क्विंटल व केरोसीन २००५ लिटरचे वितरण झाले. दरम्यान, तुरडाळीचे वाटप अद्याप सुरूच असून २० सप्टेंबरपर्यंत ६८ पूरग्रस्त कुटुंबांना ती प्राप्त झाली आहे. उर्वरित बांधित कुटुंबांना लवकरच डाळीचे वाटप करण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाच्या अधिकारी, कर्मचारी व रास्तधान्य दुकानदारांनी पूरग्रस्तांपर्यंत धान्य व केरोसीन पोहचवण्यात योगदान दिले.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:50 PM 02-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here