रत्नागिरी जिल्ह्यात ८२.५८% सातबारा ऑनलाईन

0

गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यात सातबारा उताऱ्याच्या संगणकीकरणाचे तसेच दुरूस्तीचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील केवळ २६९ तलाठ्यांनी आत्तापर्यंत १७ लाख २५ हजार ३६५ (८२.५८ टक्के) सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाईन उपलब्ध करून दिले असल्याने आता हे सातबारा उतारे ऑनलाईन पाहता येणार आहेत. आता केवळ अधिक खातेदार असलेले ३ लाख ६३ हजार ९०६ सातबारांचे संगणकीकरण शिल्लक राहिले आहे. शासनाने राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत फेब्रुवारी २०१८मध्ये सातबारा दाखल्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले होते. त्यासाठी ‘एडिट मॉड्युल’ हे दुरूस्तीसाठी असलेले नवे सॉफ्टवेअर सर्व जिल्ह्यांना दिले. त्या माध्यमातून सातबारा दुरूस्तीचे काम सुरू झाले होते. आधीच सातबारा उताऱ्यांवर अधिक खातेदारांची नावे असलेला तसेच सर्वाधिक सातबारा उतारे असलेला जिल्हा म्हणून रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्यातच खातेदारांची संख्याही अधिक असल्याने तलाठ्यांना दुरूस्ती करताना प्रचंड कसरत करावी लागत होती. जिल्ह्यात एकूण २० लाख ८९ हजार २७१ सातबारा आहेत. सध्या यापैकी १७ लाख २५ हजार ३६५ दाखल्यांचे काम (८२.५८ टक्के) पूर्ण झाले आहे. आता केवळ ३ लाख ६३ हजार ९०६ दाखले ऑनलाईन करण्याचे काम सुरू आहे. सातबारा उताऱ्यावर अनेक खातेदार असल्याने दुरूस्तीसह ते ऑनलाईन करण्याचे काम अतिशय क्लीष्ट आहे. अनेक सातबारांवर खातेदारांची नावे जास्त असल्याने त्यात दुरूस्ती करणे तसेच ते ऑनलाईन उपलब्ध करून देणे अवघड होत आहे. मात्र, तरीही जिल्ह्यातील केवळ २६९ तलाठ्यांनी हे शिवधनुष्य पेलत १७ लाख २५ हजार ३६५ सातबारा उतारे ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी तलाठी हे जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी रात्रं-दिवस काम करीत होते. प्रत्येक तलाठ्याकडे दिवसाला सुमारे सात ते आठ हजार सातबारांचे काम देण्यात आले होते. मात्र, आता हे काम जवळपास पूर्ण होत आले असून, फेब्रुवारी २०२० अखेरीस उर्वरित ३ लाख ६३ हजार ९०६ सातबारेही डिजिटल स्वाक्षरीसह आॅनलाईन उपलब्ध होतील, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

HTML tutorial


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here