मुलांची काळजी घेणे आपली जबाबदारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई : आजपासून सुरु झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत अशा निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी आज संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते. शाळा सुरु करुन आपण मुलांच्या विकासाचे, प्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोत. मात्र मुलांची अधिक काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, अपर मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णा, या प्रत्यक्ष तर शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, संचालक राहुल त्रिवेदी, टास्क फोर्स सदस्य डॉ. सुहास प्रभू, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद चे विकास गरड ऑनलाईन उपस्थीत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आज जेव्हा सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेत जाणार आहेत. तेव्हा मला माझे शाळेचे दिवस आठवत आहेत. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. मित्रांना भेटण्याची उत्सुकता असायची, नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे. आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा सर्वात आव्हानात्मक काळ सुरू आहे. मुलं ही फुलासारखी नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते या विषयावर टास्क फोर्सशी नियमीत चर्चा होत असते. शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणे कठीण होता असंही ते म्हणाले. शाळा सुरु करतांना वर्ग खोल्यांची दारे बंद नसावीत, हवा खेळती असावी, शाळेंचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. निर्जंतुकीकरण करतांना मुलांच्या आरोग्याला अपाय होणार नाही याची देखील काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन सांगितले. आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या. पावसाळ्यामुळे तसेच इतर अनेक साथीचे रोग येत आहेत. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेवावे. स्वःतला बरे वाटत नसेल तर शंका आल्यास लगेच कोरोना चाचणी करून घ्यावी अशी सर्व पालक आणि शिक्षकांना या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी विनंती केली.

▪️ मुलांशी भावनिक संवाद साधणार : प्रा. वर्षा गायकवाड
आजपासून शाळा सुरु होत असल्या तरी काही दिवस मुलांशी भावनिक पातळीवर संवाद साधल्या जाणार आहे. प्रदीर्घ कालावधीसाठी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक गरज, त्याच्याजवळ शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध असलेली शैक्षणिक साधन सुविधांनुसार त्याच्या संपादणूक पातळीनुसार त्याची गुणवत्ता वृद्धीसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. प्रा. गायकवाड पुढे म्हणाल्या, ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आज पासून सुरु होत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये आपण अनेकदा शाळा सुरु करण्याबाबतचे प्रयत्न केले पण कोविड -१९ ची तीव्रता लक्षात घेवून विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याचा विचार करून आपण प्रत्यक्षपणे शाळा सुरु करू शकलो नाही.

▪️ सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याचा शुभारंभ
आज जरी ग्रामीण आणि शहरी भागातील काही शाळा आपण सुरु करीत असलो तरी काही आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने त्यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी “माझे विद्यार्थी माझी जबाबदारी” या अभियानाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याचा शुभारंभ करीत आहोत. विद्यार्थिनिहाय शैक्षणिक गरजा, उपलब्ध सुविधा, विद्यार्थ्यांचे मुलभूत कौशल्य व अध्ययन निष्प:तीचे सर्वेक्षण करून शाळास्तरावर निश्चित व सातत्यपूर्ण आराखडा तयार करून अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये अध्यापनाचे नियोजन, वेळापत्रक, उपस्थिती, साहित्य, पालक सहभाग, मूल्यमापन, अभ्यासेत्तर नियोजन, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शैक्षणिक सुविधा, शारीरिक आरोग्य व मानसिक स्वास्थ्यासाठीचे विशेष नियोजन करण्यात येणार आहे.

▪️ शाळा बंद पण शिक्षण सुरु
मार्च २०२० पासून कोविड-१९ ची संसर्गता लक्षात आल्याने लॉक डाऊनमुळे शाळा तडकाफडकी बंद कराव्या लागल्यात. पण आपला शिक्षण विभाग मात्र निरंतर विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचावे म्हणून निरंतर कार्यरत राहिला आहे. याबद्दल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेवून त्यांनी मागील १८ महिन्यात ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने अत्यंत परिणामकारक उपक्रम राबवले आहेत. रेडीओ, दूरदर्शन, व्हॉटसअप, युटुयब, फेसबुक, गुगल क्लासरूम या सर्व माध्यमाचा प्रभावी वापर करीत मुलांना त्यांच्या इयात्तानुरूप शिकत ठेवले आहे. असेही प्रा. गायकवाड यांनी सांगितले.

▪️ शिक्षण चक्र सुरु रहावे : डॉ.सुहास प्रभू
माझा विद्यार्थी माझी जबाबदारी हा शासनाचा उपक्रम स्त्युत्य असून विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी टास्क फोर्स ने सूचविलेल्या सूचनांचे पालन करून शाळा सुरु होत आहेत, याबद्दल आनंद व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे चक्र सुरु रहावे अशी भावना टास्क फोर्सचे सदस्य आणि जेष्ठ बालरोग तज्ञ डॉ. सुहास प्रभू यांनी व्यक्त केली. कोरोना कालावधीत जी मुलं शाळा बाह्य झाली असतील त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची गरज डॉ. प्रभू यांनी व्यक्त केली. पालक आणि शिक्षक यांनी सातत्याने संपर्कात राहून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावे असेही ते म्हणाले.
शालेय शिक्षण विभागातर्फे शाळा सुरु होण्याप्पुर्वी घेण्यात आलेल्या उपाय योजनांबद्दल अपर मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णा यांनी माहिती दिली. पुणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत उपस्थित असलेल्या आयुक्त विशाल सोळंकी यांनी उपस्थितांचे आभार मानले. तर श्री विशाल गरड यांनी सूत्रसंचालन केले. शालेय शिक्षण विभागाने तयार केलेल्या ध्वनीचित्रफीतीचेही यावेळी अनावरण करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
5:03 PM 04-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here