राज्यस्तरीय कबड्डी : रत्नागिरी-रायगड आणि मुंबई-ठाणे यांच्यामध्ये रंगणार उपांत्य फेरीचा थरार

0

स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीच्या चारही सामन्यांनी कबड्डीप्रेमींची घोर निराशा केली. राज्य अजिंक्यपद स्पर्धेत विजेत्या आणि उपविजेत्या ठरलेल्या रत्नागिरी आणि मुंबई शहरने आपल्या विजयाचा धडाका कायम ठेवत सहजगत्या उपांत्य फेरी गाठली. रायगडने कोल्हापूरची 41-12 अशी धूळधाण उडवत थाटात अंतिम चार संघात धडक मारली तर ठाण्याने मुंबई उपनगरचे आव्हान 42-32 असे सहज परतवून लावले. आता उपांत्य फेरीत रत्नागिरीची झुंज रायगडशी होईल तर मुंबई शहर आणि ठाणे अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी एकमेकांशी भिडतील. काल थरारक सामन्यांच्या मेजवानीचा आनंद उपभोगणाऱ्या प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत उभारलेल्या जनार्दन राणे क्रीडानगरीत तिसऱ्या दिवशी एकतर्फी सामन्यांचे दाट धुके पसरले होते. साखळीत दोन्ही लढती जिंकलेल्या रायगडने अमीर धुमाळ आणि स्मितील पाटीलच्या चौफेर चढायांनी कोल्हापूरला पहिल्या मिनिटापासूनच डोके वर काढू दिले नाही. पूर्वार्धातच कोल्हापूरवर 3 लोण चढवत रायगडने 30-7 अशी निर्णायक आघाडी घेऊन आपला विजय जवळजवळ निश्चित केला. उत्तरार्धातही या लढतीत काहीही चुरस दिसली नाही आणि हा कंटाळवाणा सामना 41-12 असा संपला. रत्नागिरीलाही सांगलीला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी फार प्रयत्न करावे लागले नाही. चढाईत रोहन गमरे आणि पकडीत शुभम शिंदेचा खेळ इतका भन्नाट होतं की सांगलीचे काहीएक चालले नाही. मध्यंतरालाच 27-11 अशी आघाडी घेत त्यांनी उपांत्य फेरीचा प्रवेश निश्चित केला होता. त्यावर रत्नागिरीने 39-23 असे शिक्कामोर्तब केले. मुंबई शहरनेही आपल्या लौकिकास खेळ करताना काल नशिबाने आलेल्या पालघरला 45-29 असे सहज नमवून उपांत्य फेरी गाठली. सुशांत साईलने सुसाट चढाया करीत 13 गुण टिपले तर ओंकार जाधवने 10 गुणांची कमाई केली. पालघरकडून जतीन तामोरे आणि योगेश देसले यांनी चांगला खेळ केला. पहिले 3 सामने निरस झाल्यानंतर उपनगर आणि ठाणे यांच्यातील लढत चुरशीची होता होता राहिली. सोनू थळे आणि सूरज दुदले यांनी वेगवान सुरुवात करीत ठाण्याला 19-12 अशी आघाडी मिळवून दिली. सामना संपायला सहा मिनिटे असताना ठाणे 33-22 असे आघाडीवर होते. तेव्हा उपनगरच्या आकाश कदमने ठाण्यावर खोलवर चढाई करून 2 गुण मिळवले. गुणफलक 25-33 असताना ठाण्याचा फक्त उमेश म्हात्रेच शिल्लक होता. तोसुद्धा चढाईची किमान 30 सेकंद संपताच बाद होणार होता आणि ठाण्यावर लोणची नामुष्की ओढावली होती, पण तेव्हाच निलेश साळुंखे आणि विक्रांत नार्वेकरने उमेशला पकडण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न निव्वळ आत्महत्या ठरला. ठाण्यावर लोण पडला असता तर गुणफलक 28-33 झाला असता, पण तसे घडले नाही आणि ठाण्याने 42-32 अशी लढत जिंकली. उमेशने 7 तर सुरजने 8 गुण चढाईचे टिपले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here