खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा पदभार तात्पुरता काढण्यात आला

0

खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर सध्या रत्नागिरी कारागृहात असल्याने खेड नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदाचा भार शिवसेनेचे उपनगराध्यक्ष सुनील दरेकर यांच्याकडे तात्पुरता सोपविण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार खेडचे मुख्याधिकारी यांनी हा पदभार दरेकर यांच्याकडे सोपवला. कारागृहात असलेले वैभव खेडेकर पुन्हा हजार होईपर्यत हा पदभार दरेकर यांच्याकडे असेल, असे जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

महामार्गावरील जगबुडी पुलाच्या अप्रोच रोडवर पडलेल्या खड्डयांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 26 जून रोजी आंदोलन छेडले होते. या आंदोलनादरम्यान महामार्ग विभागाचे अभियंता आर. के. बामणे आणि प्रकाश गायकवाड यांना पुलाच्या रेलिंगला बांधल्याच्या आरोपाखाली वैभव खेडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती.

6 जुलै रोजी खेडेकर याना अटक झाल्यानंतर त्यांची रवानगी सुरूवातीला पोलीस कोठडीत व त्यानंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असल्याने ते या परिस्थितीत नगरपरिषदेचा कारभार पाहू शकत नसल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी जिल्हाधिकारी यांना कळवले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नगरपरिषद अधिनियम 1665 चे कलम 57 (2) अन्वये जोपर्यंत नगराध्यक्ष वैभव खेडेकर पदावर हजर होत नाहीत तो पर्यंत पालिकेच्या नगराध्यक्ष पदाची कर्तव्ये उपनगराध्यक्ष सुनील दरेकर यांनी पार पडवीत असा आदेश दिला आहे.

महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता प्रकाश गायकवाड यांनी यांनी 2 जुलै रोजी खेड पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार वैभव खेडेकर व अन्य आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दि 6 रोजी खेड पोलिसांनी अटक केली होती. त्यांची रवानगी सुरवातीला दि 12 पर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली. त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांची रवनगी दि 16 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडीत केली होती. परंतु खेडेकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दि 12 ते 16 या कालावधीत कलंबनी उपजिल्हा रुग्णालयात व त्यांनतर पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यांची प्रकृती न सुधारल्याने त्यांना अधिक उपचारासाठी सर जे.जे. रुग्णालय मुंबई येथे नेण्यात आले. त्या ठिकाणी दि 18 ते 25 जुलै या कालावधीत उपचार करण्यात आले. दि 25 रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्या नंतर त्यांना पोलीस बंदोबस्तात मुंबई येथून आणून रत्नागिरी येथील जिल्हा कारागृहात कोठडीत ठेवण्यात आले होते. दरम्यान न्यायालयाने खेडेकर याना दि 18 ऑगस्ट पर्यंत पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

खेडेकर याना अटक झाल्यानंतर त्यांना पालिकेचा पदभार विहित प्रशासकीय दृष्टया उपनगराध्यक्ष यांच्याकडे सोपवता आला नव्हता. या संदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी पालिकेचा कार्यभार चालवण्यासाठी पदभार सोपवण्यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना कळवले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दि 30 रोजी आदेश करत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1665 चे कलम 57(2) अनव्ये नगराध्यक्ष पदाचा कार्यभार उपनगराध्यक्ष सुनील दरेकर यांचेकडे सोपवला आहे. वैभव खेडेकर हे नगराध्यक्ष पदावर हजर होई पर्यंत उपनगराध्यक्ष दरेकर यांनी नगराध्यक्ष पदाची कर्तव्य पार पाडावीत असे आदेशात नमूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here