महाराष्ट्र बंद: मुंबईत तीन अदखलपात्र, उर्वरित राज्यात आठ गुन्हे दाखल

0

मुंबई : लखीमपूर खेरी शेतकरी हिंसाचार प्रकरणी सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर राज्यभरात विविध ठिकाणी निदर्शने, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुंबई वगळता उर्वरित राज्यात आठ गुन्हे, मुंबईत दोन गुन्हे आणि तीन अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय मुंबईत २०० जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
जळगावसह एक-दोन ठिकाणे वगळता अनुचित प्रकार घडले नाही. बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यात ४८ ठिकाणी रास्ता रोको, निदर्शने, रॅली काढण्यात आले. सोलापूर येथील अकलूज परिसरात अकलूज टेंभुर्णी मार्गावर टायर जाळल्याचा प्रकार घडला. त्याशिवाय नवी मुंबईत सर्वाधिक म्हणजे पाच गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. त्यात वाशी, खांदेश्वर, कामोठे, पनवेल शहर आणि तळोजा पोलीस ठाण्यांच्या समावेश आहे. याशिवाय कोल्हापूर येथे गांधीनगर व करवीरनगर येथे दोन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली, तर मीरा भाईंदर येथील माणिकपूर पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबई वगळता राज्यभरात सोमवारी सायंकाळपर्यंत आठ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. पण परिस्थिती शांत असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मुंबईत ३५ हजार पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन कंपन्या, ७०० सशस्त्र पोलीस दल व ५०० गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांच्या माध्यमांतून मुंबईत बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रकरणी कफ परेड, डीबी मार्ग, नागपाडा, भायखळा, वरळी, दादर, माहिम, धारावी, खेरवाडी, कांदिवली, कुरार, कस्तुरबा मार्ग, समतानगर पोलिसांनी या २०० व्यक्तींना ताब्यात घेतले.विक्रोळी येथे द्रुतगती मार्गावर टायर जाळून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय कांदिवली व समतानगर पोलीस ठाण्यात बंद प्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले. दोन्ही प्रकरणांमध्ये १४ व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान सदर बंद बेकायदा असल्याचे जाहीर करावा, अशी मागणी अॅड्. अटलबिहारी दुबे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्याकडे केली आहे. या संदर्भात दुबे यांनी पत्रही लिहिले आहे. दुबे यांनी पत्रात म्हटले आहे की, न्यायालयाने या बंदची स्वत:हून दखल घ्यावी आणि त्यादृष्टीने आवश्यक त्या कायदेशीर कारवाईचे आदेश द्यावेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू टाळेबंदीत नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. परंतु आता कोरोना स्थिती सुधारत असल्याने हे निर्बंध हळूहळू शिथिल केले जात आहेत. अशावेळी सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्षांनी बंद पुकारणे हे नागरिकांसाठी त्रासदायक ठरू शकते. शिवाय सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्षांनी पुकारलेला बंद हा अप्रत्यक्षपणे सरकारनेच पुकारल्यासारखे असल्याचे मानण्यात यावे, असेही दुबे यांनी म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:56 PM 12-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here