कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू देव रामेश्वर व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांचा ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळा शुक्रवारी (14 फेब्रुवारी) मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. नेत्रदीपक असा हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी हजारोंचा जनसागर मालवणात उसळला. दर तीन वर्षांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांच्या भेटीसाठी कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू देव रामेश्वर आपल्या वारेसुत्र, तरंग व रयतेसह जातो. देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये विश्वस्त मंडळ मानकरी व ग्रामस्थ यांच्या वतीने यावर्षी भेटीचा हा सोहळा 14 व 15 फेब्रुवारी या दोन दिवशी निश्चित करण्यात आला. त्यानुसार देव रामेश्वर वारेसुत्र, तरंग व रयतेसह 14 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता वाजत-गाजत कांदळगाव येथून सिंधुदुर्ग किल्ल्याकडे रवाना झाले. देव रामेश्वर मार्गावर ठिकठिकाणी गुढ्या तोरणे उभारण्यात आली होती. रांगोळीचे सडे होते. विद्युत रोषणाई व स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. पावलापावलावर भाविक देव रामेश्वरचे स्वागत करत होते. अनेक ठिकाणी भाविकांना प्रसाद वाटप, खाऊ वाटप, सरबत वाटप केले जात होते. ओझर येथे ब्राह्मण ज्ञाती बांधवांच्या वतीने व कातवड, रेवंडी, कोळंब येथील ग्रामस्थाच्या वतीने स्वागत करण्यात आले. मालवण कोळंब पूल येथे मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर व व्यापारी बांधवांनी, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व नागरिकांनी श्री देव रामेश्वराचे स्वागत केले. मालवण कोळब पुलावरून मालवणच्या हद्दीत पूर्ण स्वागताने श्री देव रामेश्वराला जोशी परिवार रीतीरिवाजाप्रमाणे आपल्या जोशीवाडा महापुरुष येथे घेऊन आले. त्यानंतर जोशी परिवाराकडून देव रामेश्वराला सिंधुदुर्ग किल्ल्यावर होडीच्या साहाय्याने सोडण्यात आले. सोहळ्यानिमित्त भाविक रयतेला सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी सिंधुदुर्ग प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशन मालवण, शिवशक्ती जलपर्यटन संस्था मालवण, रामचंद्र महादेव आचरेकर यांच्या वतीने बोटींची मोफत व्यवस्था केली होती.
