मंत्र्यांना खूश करण्यासाठी होत आहेत दवाखान्याच्या सेवांची फक्त उद्घाटने – परशुराम उपरकर

0

सिंधुदुर्गचे जिल्हा शल्यचिकित्सक मंत्र्यांना खूश करण्यासाठी डायलिसिस, आयसीयू सारख्या सेवांची उद्घाटने करीत आहेत. यापूर्वी माजी आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते एमआरआय मशीन व सीटी स्कॅन मशिनचे उद्घाटन करण्यात आले होते. त्या मशीन बंद आहेत. जिल्ह्यातील अनेक वैद्यकीय अधिकारी दोन दिवस जिल्ह्यात तर इतर दिवस आपल्या गावी जाऊन बसतात. याकडे जिल्हा शल्यचिकित्सक लक्ष देत नाहीत. त्यामुळे शासकीय आरोग्य सेवेची दयनीय अवस्था झाली आहे, असा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे. कणकवली येथील संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, जिल्हा शल्य चिकित्सक जनतेबरोबरच मंत्र्यांची फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात चालू करण्यात आलेली डायलिसिस व आयसीयू सेवा बंद आहे. आयसीयूमध्ये केवळ एसी लावून खोली थंड करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात डॉक्टर सकाळी ९ ऐवजी ११.३० पर्यंत येतात. तर जिल्हा शल्यचिकित्सक दुपारी १२ वाजता येत असतात. मुख्यालयात न राहता बरेचशे डॉक्टर आपापल्या जिल्ह्यात जाऊन काम करतात. त्याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांचा लक्ष नाही. कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक एस. एस. पाटील व जिल्हा रुग्णालयातील डॉ. गावकर हे केवळ दोन दिवस सेवा बजावून आपापल्या गावात जात असतात, असा आरोप परशुराम उपरकर यांनी यावेळी केला. जिल्हा रुग्णालयात हिंद लॅबमध्ये चुकीच्या पध्दतीने रक्त तपासणीचे अहवाल दिले जात आहेत. अणावमधील एका रुग्णाला डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी रक्त तपासणी केल्यानंतर चुकीचा अहवाल दिला. त्यामुळे चार तासांत त्या रुग्णाला हृदयविकाराचा धक्का बसला. जिल्हा शल्यचिकित्सक या सगळ्या सेवांकडे दुर्लक्ष करीत आहेत. केवळ कार्यालयीन कामकाज पाहतात. रुग्णांची स्वत: तपासणी करत नाहीत. जिल्हा शल्यचिकित्सक हे भूलतज्ज्ञ आहेत. मात्र, त्यांनी एका तरी शस्त्रक्रियेच्यावेळी उपस्थिती दर्शविली का? असा प्रश्न आहे.
पूर्वीच्या पालकमंत्र्यांना जशी चुकीची माहिती देऊन फसवणूक केली जात होती. तशी फसवणूक या नव्या पालकमंत्र्यांची केली जात आहे. आयसीयू चालविण्यासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर, फिजिशियन व लागणारा स्टाफ नसतानादेखील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यात आली आहे. आरोग्य यंत्रणा सुधारत नसल्याने जनतेने या विरोधात आवाज उठवावा. मनसे त्यांच्या पाठीशी राहिल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here