कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात संपन्न

0

कोल्हापूर : छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीरनगरीत पारंपरिक विजयादशमीचा सण ऐतिहासिक दसरा चौकात शाही थाटात आणि उत्साहात संपन्न झाला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन झाले. यानंतर छत्रपतींच्या कुटुंबातील युवराज- खासदार संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती व यशस्विनीराजे छत्रपती यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटले. तत्पूर्वी करवीर निवासिनी अंबाबाई(श्री महालक्ष्मी), जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानी आणि गुरु महाराज यांच्या पालख्यांचे लवाजम्यासह आगमन झाले. यानंतर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व कुंटुंबातील सदस्यांचे परंपरागत पध्दतीने ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन झाले. यावेळी पोलीस विभाग व टी.ए. बटालियनच्या बँड पथकाने करवीर संस्थानचे गीत वाजवून त्यांचे स्वागत केले. दसरा महोत्सव समितीच्यावतीने शाही कुटुंबातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले. शाही घराण्याच्या प्रथेप्रमाणे औक्षण केले. पारंपरिक पध्दतीने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधीवत पूजा केल्यानंतर देवीची आरती करण्यात आली. यानंतर कोल्हापूरच्या जनतेने उत्साहात सोने लुटले. यानंतर श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह राजघराण्यातील सदस्य राजवाड्यावर परतत असताना नागरिकांनी त्यांना सोने दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दसऱ्याचा कार्यक्रम शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून संपन्न झाला. या सोहळयास पालकमंत्री सतेज पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, इतिहास संशोधक डॉ.रमेश जाधव, स्थानिक लोकप्रतिनिधींसह विविध विभागांचे मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी आणि निमंत्रित उपस्थित होते. कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केवळ निमंत्रितांच्या उपस्थितीत शाही दसरा सोहळा संपन्न झाला. नागरिकांना हा सोहळा पाहता यावा, यासाठी शहरात विविध ठिकाणी एलईडी स्क्रीन व नागरिकांनी घरुन सोहळा पाहता यावा, यासाठी थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:08 AM 16-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here