मालवणच्या ‘कवडा रॉक’ वर मासे पकडण्याची स्पर्धा आयोजित

0

मालवण : साहसी पर्यटनाचे नवे केंद्र म्हणून उदयास येत असलेल्या ‘कवडा रॉक’ (मालवण) या पर्यटन स्थळाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी कवडा रॉक किंग ग्रुप आणि मालवण अँगलिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 22 फेब्रुवारी रोजी अँगलिंग फिशिंग कॉम्पिटीशन म्हणजेच गळ पद्धतीने मासे पकडण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मालवणपासून 9 किमी अंतरावर समुद्रात हे बेट असून खोल समुद्रात घेण्यात येणार ही पहिली स्पर्धा ठरणार आहे. या स्पर्धेमुळे कवडा रॉकचे महत्व वाढणार आहे, अशी माहिती मालवण अँगलिंग क्लबचे गुरुनाथ राणे, सचिन गोवेकर यांनी दिली. मालवण येथील हॉटेल समींदर येथे आयोजित पत्रकार परिषदेत अँगलिंग फिशिंग स्पर्धेची माहिती देण्यात आली. यावेळी लकी कांबळी, रुद्राक्ष आचरेकर, प्रियाल लोके, पप्पू गावकर, वरद वाळुंजकर आदी उपस्थित होते. स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना कवडा रॉकवर अस्सल मालवणी जेवणाचा आंनदही लुटता येणार आहे. 22 फेबुवारीला सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत ही स्पर्धा होईल. स्पर्धेत स्पर्धकाने समुद्रातून जिवंत मासा ‘फिशिंग रॉड’च्या साहाय्याने अथवा पारंपरिक पद्धतीने काढायचा आहे. आयोजक त्या माशाचे वजन, लांबी आदींची नोंद करतील. त्यानंतर त्या स्पर्धकाने तो जिवंत मासा पुन्हा पाण्यात सोडावा. जास्त वजनाचा मासा काढणाऱ्या स्पर्धकास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दिले जाणार आहे. स्पर्धेचा निर्धारित वेळ संपेपर्यंत स्पर्धक मासे काढू शकतात. स्पर्धेतील विजेत्या प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे 20 हजार 20, 10 हजार 20, 5 हजार 20 रोख रुपये आणि चषक आणि अन्यही विशेष पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. ही स्पर्धा पुरुष व महिलांसाठी खुली असून विजेत्या महिलेला ‘लेडी अँगलर’ म्हणून गौरविले जाणार आहे. तर कमीत कमी वजनाचा मासा काढणाऱ्या स्पर्धकासही विशेष बक्षीस दिले जाणार आहे, असे राणे यांनी सांगितले. स्पर्धकांना कवडा रॉकवर नेण्यासाठी प्रवासी बोटींची चिवला बीच येथून व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच केरळ, गोवा, मंगलोर (कर्नाटक) येथील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. आतापर्यंत 70 स्पर्धकांची नोंदणी झाली असून 100 स्पर्धक सहभागी होतील. यात विदेशी पर्यटक असतील, असे गोवेकर यांनी सांगितले. स्पर्धेच्यावेळी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून गोमंतक आपत्कालीन टीम, स्कुबा डायवर टीम, एक बोट, एक डॉक्टर तसेच सावित्री मेडिकलची प्रथमोपचार पेटी कवडा रॉकवर तैनात असतील. सर्जेकोट जेटी येथे रुग्णवाहिकेची व्यवस्था केली जाणार आहे, असे आचरेकर यांनी सांगितले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here