आजपासून मासेमारीला होणार सुरुवात

0

रत्नागिरी : गेले दोन महिने मासेमारीवर असणारी बंदीची मुदत 31 जुलै रोजी संपली असल्याने गुरुवार दि. 1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू होणार आहे. मात्र, समुद्र शांत झालेला नसल्यामुळे मच्छीमार नारळी पौर्णिमेचा मुहूर्त साधतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते. 1 जून रोजी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी सुरू झाला. शासनाकडून घालण्यात आलेली ही बंदी 31 जुलै रोजी संपुष्टात आली आहे. जोरदार पाऊस आणि वार्‍यामुळे समुद्राच्या पाण्याला करंट असतो. त्यामुळे मासेमारी बंदी उठल्यानंतरही मच्छीमार समुद्रात जात नाहीत. नारळी पौर्णिमेनंतर समुद्र शांत होण्याची वाट हे मच्छीमार पाहतात. सध्या किनारपट्टीवर मच्छीमार बांधव जाळी विणने, बोटींची दुरुस्ती आदी कामात गुंतला आहे. त्यात समुद्रही काहीसा शांत असल्याने मासेमारी हंगामाची सुरुवात आश्‍वासक होईल या अपेक्षेने मच्छीमार वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, पावसाळी हंगाम सुरू असल्याने मासेमारी बंदी उठली तरी सुरुवातीला  छोट्या होड्या समुद्रात मासेमारीसाठी उतरतील, अशी शक्यत वर्तवण्यात येत आहे. मिरकरवाडा बंदरातील गाळाचा उपसा झाल्याने यावर्षी मासेमारी नौका अडथळ्याशिवाय समुद्राकडे रवाना होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिरकरवाडा बंदरासह लहान आणि मध्यम स्वरूपाची अशी सुमारे 40 बंदरे आहेत. या सर्व बंदरांमध्ये मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीनंतर नव्या मासेमारी हंगामाची गुरुवारपासून सुरुवात करण्यास मच्छीमार उत्सुक आहेत. जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार मच्छीमारी बोटी आहेत. यामध्ये सर्वाधिक अडीच हजार नौका यांत्रिक असून, उर्वरित नौका बिगर यांत्रिक आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here