रत्नागिरी : काँग्रेसने विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती बुधवारी सकाळी पूर्ण झाल्या आहेत. राजापूर विधानसभेसाठी आठ पदाधिकार्यांनी उमेदवारीची मागणी केली असून, अजित यशवंतराव यांना उमेदवारी मिळावी, यासाठी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी जोर धरला होता. इच्छुकांमध्ये दापोलीमधून मुश्ताक युनुस गिरकर यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. चिपळूणमधून जिल्हा सरचिटणीस इब्राहीम दलवाई व अशोक जाधव यांनी रत्नागिरी विधानसभेसाठी दीपक राऊत यांनी उमेदवारीची मागणी केली आहे.राजापूर विधानसभा मतदार संघातून आठ इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. यात अविनाश लाड, अजित यशवंतराव, विनय खामकर, आनंद भडेकर, राजेश राणे, सदानंद गांगण, महमंदअली वाघू व संजय आयरे या इच्छुकांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित यशवंतराव यांनी काँग्रेसमधून उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून मुलाखत दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रदेश सरचिटणीस रमाकांत म्हात्रे, प्रदेश सचिव तौफिक मुल्लाणी यांनी इच्छुकांशी संवाद साधत मुलाखती घेतल्या. यावेळी आमदार हुस्नबानू खलिफे, जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मंदार सप्रे म्हणाले की, यशवंतराव हे गेली दोन वर्षे काँग्रेसमध्ये येण्यास उत्सूक आहेत. ते तरूण आहेत, त्यांना संधी दिली पाहिजे. नवीन चेहरा असल्यामुळे काँग्रेसला तगडा उमेदवार मिळेल. सप्रे यांना समर्थन करण्यासाठी काँग्रेसमधील अनेक कार्यकर्ते पुढे सरसावले. त्यांनीही बाजू उचलून धरत उमेदवारी जाहीर करा असा आरडाओरडा केला. अखेर प्रदेश सचिव तौफिक मुल्लाणी यांनी उभे राहत सर्व कार्यकर्त्यांना शांत राहण्याच्या सूचना केल्या. यावेळी मुल्लाणी म्हणाले की, आम्हाला उमेदवार ठरवण्याचे अधिकार नाहीत, मुलाखती घेऊन येथील परिस्थिती वरिष्ठापर्यंत पोहचवायची असून, उमेदवारीही प्रदेश पातळीवरुनच जाहीर होणार असल्याचे मुल्लाणी यांनी स्पष्ट केले. कार्यकत्यार्ंच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर गोंधळावर पडदा पडला. अजित यशवंतराव यांनी काँग्रेस पक्षाची ऑनलाईन नोंदणी केली असून, त्याची पावती सादर केली. त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारुन मुलाखत घेतली. उमेदवारीबाबत पक्ष निर्णय घेईल, असे रमाकांत म्हात्रे यांनी सांगितले. काँग्रेसमधील इच्छुकांच्या मुलाखतीनंतर काँग्रेसभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेश सरचिटणीस रमाकांत म्हात्रे म्हणाले की, मुलाखतीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पक्ष वाढवण्यासाठीचे योगदान, बुथ कमिट्यांची बांधणी, मी कसा निवडून येईन याबाबत उमेदवारांनी आपले मत मांडले. हे सगळे अर्ज काँग्रेसच्या राज्य निवड समितीकडे पाठविण्यात येणार आहेत. 7 ला होणार्या बैठकीत यावर चर्चा होईल. त्यानंतर श्रेष्ठी निर्णय घेतील. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या उमेदवारीबाबतच्या भावनाही वरीष्ठांपर्यंत पोचविण्यात येणार आहेत. राजापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांच्या सुचना श्रेष्ठींकडे मांडू असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभेसाठी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी करुन निवडणूक लढवणार असल्याचे अजित यशवंतराव यांनी सांगितले. राजापूरची जागा ही काँग्रेसकडे आहे. आघाडीतील घटक पक्षाचा पदाधिकारी म्हणून या जागेसाठी आपण अर्ज केला असल्याचे अजित यशवंतराव यांनी सांगितले.
