‘गृहमंत्री राहिलेला माणूसच भ्रष्टाचारात अडकलेला असेल तर…’ : अण्णा हजारे

0

अहमदनगर : राज्यातील महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केवळ महिला आयोग नेमून काय होणार? त्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद असणाऱ्या कडक कायद्याची गरज आहे. मात्र, राज्याच्या गृहमंत्रिपदी राहिलेल्या व्यक्तीच जर भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकत असतील तर गुन्हेगारांवर धाक काय रहाणार? त्यामुळेच असे प्रकार वाढत आहेत, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. पारनेर तालुक्यातील जवळे गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आहे. यातील आरोपींचा पोलिसांना अद्याप तपास लागलेला नाही. या घटनेचा गावात आणि तालुक्यातही निषेध करण्यात आला. यासंबंधी प्रसार माध्यमांशी बोलताना हजारे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हजारे म्हणाले, राज्यात सध्या महिला आणि विशेषतः अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. यासाठी केवळ महिला आयोग नेमून चालणार नाही. त्याने काही फरक पडणार नाही. कायदा कडक करण्याची गरज आहे. सरकारची इच्छा असेल तर त्यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात यासंबंधी कठोर कायदा करावा. त्यामध्ये गुन्हेगाराला फाशीच्या शिक्षेची तरतूद असली पाहिजे. त्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत.’ हजारे पुढे म्हणाले, ज्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखायची तेच भ्रष्टाचाराच्या आरोपांत अडकले आहेत. महिला अत्याचार वाढण्यामागे हेही एक कारण आहे. माजी गृहमंत्रीच अशा पद्धतीने अडकत असतील तर गुन्हेगारांवर धाक काय राहणार? त्यामुळे आता सरकारने कडक कायदे करावेत. केवळ महिला आयोगाने हा प्रश्न सुटणार नाही. देशात राज्यघटना सर्वोच्च आहे. घटनेनुसार कठोर कायदे करा आणि त्यांची कडक अमलबाजवणी करा. तरच गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसेल. यामध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांचाही गुन्हेगारांवर वचक दिसून येत नाही, त्यामुळे अशा दुर्दैवी घडत आहेत.’

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:04 PM 22-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here