‘सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी…’; मनसेचं शिवसेना खासदार विनायक राऊतांना प्रत्युत्तर

0

मुंबई : अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. यावेळी कांचनगिरी यांच्यासोबत सूर्याचार्यजी देखील उपस्थित होते. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी यांनी राज ठाकरे यांच्यामध्ये शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते, असं सांगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचं नाव बुडवलं अशी टीका त्यांनी केली होती. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विचारधारा जमत असेल तर मनसेनं भाजपासोबत जायला हवं, असं मत देखील कांचनगिरी यांनी व्यक्त केलं होतं. कांचनगिरी यांच्या या वक्तव्यावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी आहे, हे दाखवून दिलेलं आहे. परप्रांतियांचा प्रश्न उभा करत उत्तर भारतीयांना मारायचं, बिहारी लोकांची सालटी काढायची हे धंदे राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षाच्या स्वार्थासाठी केलं आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे. तसेच भाजप राज ठाकरेंना शिवसेनेशी लढण्यासाठी शिखंडीसारखा वापर करत असतील, तर ते योग्य ठरणार नाही. उलट भाजपची सर्व मतं शिवसेनेकडे येतील, असा दावा देखील विनायक राऊत यांनी यावेळी केला आहे. विनायक राऊत यांच्या या टीकेला आता मनसेनं देखील प्रत्युत्तर दिलं आहे. मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे. सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे, त्यामुळे तुमच्यातला जरासंधचा उभा चिरून वध करणं आम्हाला सहज शक्य आहे. तोपर्यंत तुम्ही कधी भाजपाबरोबर, तर कधी काँग्रेसबरोबर युत्या, आघाड्या करून श्रीखंड खात रहा, असं म्हणत लवकरच रणशिंग फुंकल जाईल, असा इशारा देखील अखिल चित्रे यांनी दिला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:12 PM 23-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here